लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सोशल मीडियाद्वारे मैत्री करून परदेशातून गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने एका तरुणीला विविध बँक खात्यावर पैसे भरायला लावून तब्बल १७ लाख २२ हजाराला गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनोबा भावेनगर पोलिसांनी एका परदेशी तरुणीला दिल्लीतून अटक केली आहे.
जेसिंटा ओकोनोवा ओफना (वय २६) असे तिचे नाव असून, ती नायजेरियन नागरिक असल्याचे विनोबा भावेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांनी सांगितले. निरीक्षक मारुती रढे, उपनिरीक्षक जितेंद्र सपकाळे, अंबिका धस्ते यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने या प्रकरणाचा तपास करून तिला पकडले. तिच्या परदेशी सहकाऱ्याचा शोध सुरू आहे.
कुर्ला पश्चिम परिसरात राहत असलेल्या ३४ वर्षांच्या एका तरुणीशी तिच्या इन्स्ट्राग्राम अकाउंटवर गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये अँड्रा ओलिव्हरा या नावाने मैत्री केली. यूकेत राहत असून, रशिया येथे पायलट असल्याचे खोटे सांगितले. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर काही दिवसांनी कुरिअरकरवी गिफ्ट पाठविले असल्याचे सांगितले. त्यानंतर आरतीला अंकिता शर्मा नावाच्या महिलेने कॉल करून कुरिअर आले असल्याचे सांगून त्यासाठी विविध बँक खात्याचे अकाउंट नंबर देऊन रक्कम भरण्यास सांगितले. तिच्याकडून एकूण सतरा लाख बावीस हजार १५० रुपये इतकी रक्कम वेगवेगळ्या बॅंक खात्यातून उकळली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दिल्लीतून फोन करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तपासासाठी उपनिरीक्षक जितेंद्र सपकाळे, अंबिका घस्ते व पथक १७ जानेवारीला दिल्ली येथे गेले होते. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने जेसिटाला अटक केली.
तिच्याकडून सात आंतरराष्ट्रीय सिम कार्ड, १३ बँक अकाउंट व अन्य दस्तावेज जप्त केला. ट्रँझिस्ट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले आहे. अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
............