Join us  

गड्या अपुला गाव बरा; स्थलांतरितांची रेल्वे स्थानकांवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:05 AM

कडक निर्बंधांमुळे पुन्हा परतीच्या मार्गावर; आरक्षित तिकीट मिळवण्यासाठी धावपळलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक ...

कडक निर्बंधांमुळे पुन्हा परतीच्या मार्गावर; आरक्षित तिकीट मिळवण्यासाठी धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध लागू झाले आहेत. त्याआधीच हे निर्बंध लागू हाेतील, या भीतीने हातावर पोट असणारे स्थलांतरित मजूर, कामगार गावी परतू लागले हाेते. त्यानंतर बुधवारी रात्रीपासून लागू झालेल्या कडक निर्बंधांनंतर आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लाेकमान्य टिळक टर्मिनस, दादर, कुर्ला टर्मिनस, बोरिवली, मुंबई सेंट्रलसारख्या जंक्शनवर स्थलांतरित मजुरांची गावी जाण्यासाठी पुन्हा माेठ्या प्रमाणावर गर्दी हाेत आहे. मात्र, केवळ आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वेने प्रवास करता येत असल्याने तिकीट मिळवण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही कामगार स्थलांतर करीत आहेत. कामगारांनी स्थलांतर करू नये, तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करीत राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही सातत्याने दिली जात आहे. मात्र, बाहेरगावी विशेषत: उत्तर भारतात जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांचे प्रमाण अधिक आहे. दादर, मुंबई सेंट्रल, बोरिवलीच्या तुलनेत कुर्ला टर्मिनसवर बाहेर जाण्यासाठी येणाऱ्या स्थलांतरित मजुरांचे प्रमाण जास्त आहे. कारण सायन, कुर्ला, धारावीसह पूर्व उपनगरातील बहुतांश परिसरात मोठ्या संख्येने स्थलांतरित मजूर राहतात. येथील चेंबूर, मानखुर्द, कुर्ला, सायन आणि धारावीसारख्या परिसरात मोठे उद्योगधंदे आहेत. काेराेना संकटामुळे यातील बहुतांश आता बंद आहेत किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी येथील कामगारांच्या हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही. त्यामुळे येथील स्थलांतरित मिळेल त्या मार्गे आपल्या गावी जात आहेत. त्यामुळेच कुर्ला टर्मिनस येथे गावी जाण्यासाठी येणाऱ्या स्थलांतरित मजुरांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या आठवडाभरापासूनच त्यांनी परत जाण्यास सुरुवात केली असून, बुधवार आणि गुरुवारी यात आणखी भर पडली आहे.

* रोजगार गेला; चिंता उदरनिर्वाहाची!

कामाठीपुरा, रे रोड, शिवडी, भायखळा, वांद्रे, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, विद्याविहार, सायन, धारावी, माहीम, अंधेरी, साकिनाका, घाटकोपर, बोरिवली, जोगेश्वरी येथे मोठ्या प्रमाणावर कामगार, मजूर राहतात. यातील बहुतांश नाका कामगार, रोजंदारीवर काम करणारे आहेत. कडक निर्बंध लागू झाल्याने कामगारांचा रोजगार गेला. रोजंदारी बुडाल्याने त्यांना उदरनिर्वाहाची चिंता सतावत असल्याचे या मजुरांनी सांगितले.

* विशेष अतिरिक्त गाड्यांची साेय

प्रवाशांच्या साेयीसाठी मुंबई आणि दानापूर तसेच पुणे आणि भागलपूरदरम्यान विशेष अतिरिक्त गाड्या चालविल्या जात आहेत. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येत आहे. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड - १९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

.....................................