Join us  

अंधेरी पूल दुरुस्तीला पालिकेकडून निधी मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 6:08 AM

२ कोटी २२ लाखांचा खर्च अपेक्षित, गलथान कारभाराचा प्रवाशांना त्रास

मुंबई : अंधेरी गोखले पुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र निधीअभावी अंधेरी पूल दुरुस्ती रखडणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मुंबई महापालिकेने पूल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केल्यानंतर पूल दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांनी सांगितले. यामुळे रेल्वे आणि महापालिका यांच्या वादात निधीअभावी कोट्यवधी मुंबईकरांच्या डोक्यावर धोकादायक पुलांची टांगती तलवार कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.अंधेरी पूल दुर्घटनेच्या ५० दिवसांनंतरही पूल दुरुस्तीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. पुलाच्या दुरुस्तीसाठी अंदाजे २ कोटी २२ लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांच्या माहितीनुसार, अंधेरी गोखले पुलाच्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने पूल दुरुस्तीचा निधी उपलब्ध केल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून दुरुस्ती कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येईल.३ जुलै रोजी अंधेरी गोखले पुलाचा पादचारी भाग कोसळला होता. रेल्वे सुरक्षा आयोगाच्या प्राथमिक अहवालात केबल, माती, पेव्हर ब्लॉक भरावाच्या वजनामुळे पूल कोसळल्याचे स्पष्ट करण्यात आले. सुमारे दीड महिन्यापासून गोखले पुलावरील एकल मार्ग सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.लोअर परळ पुलाच्या प्रत्यक्ष पाडकामाला सुरुवात झाल्यानंतर तातडीने अंधेरी गोखले पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. महापालिकेच्या निधीसाठी तूर्तास तरी वाट न पाहता कंत्राटदाराला दुरुस्तीच्या सूचना देण्यात येतील. दुरुस्ती केल्यानंतर त्वरित पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.आयआयटीकडून १७ पुलांची तपासणी पूर्णपश्चिम रेल्वेवरील २९ रोड ओव्हर पुलांपैकी (आरओबी) आयआयटीच्या नेतृत्वाखालील रेल्वे आणि महापालिका अधिकाºयांच्या संयुक्त पथकाने १७ पुलांची तपासणी पूर्ण केली आहे. उर्वरित पुलांची तपासणी लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

टॅग्स :अंधेरी