बोईसर : परीक्षार्थ्याने परीक्षा दिल्यानंतर निकालाची आतुरतेने तर काहीशा चिंतेने निकालाची वाट पाहत असतो. भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीही काहीशी तशीच परिस्थिती असते. वर्षभर शेतकऱ्यांचेच डोळे व लक्ष भातझोडणीनंतर त्यातून मिळालेल्या भाताकडे (ग्रामीण भागातील प्रचलित शब्द उताऱ्याकडे) चातकाप्रमाणे लागलेले असते. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कमी-जास्त फरकाने असेच सुरू आहे.पालघर जिल्हा बंदरपट्टी, शहरी आणि जंगलपट्टी अशा तीन भागांत विभागला आहे. शहरी भाग सोडला तर बंदर व जंगलपट्टीमध्ये भातशेतीच्या लागवडीचे क्षेत्र मोठे होते, तर बहुसंख्य गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने भाताचे पीक घेण्याची पद्धत पिढ्यान्पिढ्या सुरू असली तरी अलीकडच्या काळात शेतमजुरीचे वाढलेले दर, त्यांचा गंभीर झालेला प्रश्न, भात बी, खते, रसायनांचे वाढलेले भाव याबरोबरच वाढत्या औद्योगिकीकरणामुळे भातशेतीचे प्रमाण सातत्याने घटत आहे.भातशेती निसर्गावर पर्यायाने पावसावर असल्याने निसर्ग व पावसाच्या लहरी तसेच अनियमितपणाला सामोरे जाऊन आणि भातशेती हा तसा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. याची पूर्ण खात्री शेतकऱ्यांना असूनही भातशेतीशिवाय पोटाची खळगी भरण्यासाठी आणखी पर्यायच उपलब्ध नसल्यामुळे अनेक संकटांना सामोरे व अनेक बाबींवर मात करून शेतकरी आपला पारंपरिक व्यवसाय पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे त्याला यातून अपयशच पदरी पडत आहे. तर या भागातील भात शेतकरी असंघटित असून आणि खंबीर नेतृत्वाअभावी त्यांचा कुणीही वालीच नसल्यासारखी अवस्था झाली आहे, तर शेतकरी वार्षिक परीक्षेच्या निकालानंतर निराश जरूर होतो. या वर्षी निसर्गाने साथ दिली नाही, परंतु पुढल्या वर्षी निश्चित देईल, या भोळ्याभाबड्या अपेक्षेने पुन्हा पुढील हंगामाच्या तयारीला लागतो. (वार्ताहर)
भातशेतीतून यंदाही निराशाच
By admin | Updated: December 29, 2014 00:18 IST