Join us  

आदित्य ठाकरे यांच्या नावे फसवणूक; कुरिअर बॉयला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 6:20 AM

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे कुरिअर आल्याचे सांगत पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया कुरिअर बॉयला खेरवाडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे कुरिअर आल्याचे सांगत पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया कुरिअर बॉयला खेरवाडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. धीरज मोरे (१९) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून बारावीच्या परीक्षेची फी भरण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.वांद्रे पूर्वच्या कलानगर परिसरात ‘मातोश्री’ बंगल्यात हा प्रकार घडला. मोरे १२ सप्टेंबर रोजी दुपारी मातोश्री बंगल्यावर एक कुरिअर घेऊन गेला. ते कुरिअर आदित्यच्या नावाने असल्याचे सांगत ४ हजार ८९९ रुपयांचे बिलही त्याने सांगितले. आदित्यचे अंगरक्षक विनोद ठाकूर यांनी चौकशी केली असता पार्सल मागवले नसल्याचे आदित्यने सांगितल्याने ठाकूर यांनी ते उघडून पाहिले. तेव्हा त्यात एक संगणक कॅमेरा सापडला. हे पार्सल मोरेने स्वत:च तयार केल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार मोरेला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असून पैसे उकळण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले.