Join us  

जोगळेकर नाला बारप्रकरणी बोगस कागदपत्रांच्या आधारे फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 3:24 PM

२००५ साली झालेल्या महापुरात अख्खी मुंबई पाण्याखाली गेली.

मुंबई : मालाडच्या नैसर्गिक जोगळेकर नाल्याला बुजवत त्यावर अव्वाच्या सव्वा आकाराचे बीअर बार बांधल्याचे प्रकरण नुकतेच 'लोकमत' ने उघडकीस आणले आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने न्यायालयाची परवानगी घेतल्याचे पालिकेच्या पी/उत्तर विभागाने म्हटले असले तरी यासाठी त्याने बोगस कागदपत्रांचा वापर करत पालिका आणि न्यायालयाची फसवणूक केल्याचाधक्कादायक दावा सामाजिक संस्थेने केला आहे.

सामाजिक संस्था फाईट फॉर राईट फाउंडेशनचे प्रमुख विनोद घोलप यानी 'लोकमत' ला दिलेल्या माहितीनुसार, २००५ साली झालेल्या महापुरात अख्खी मुंबई पाण्याखाली गेली. ज्यात जोगळेकर नाल्याचा समावेश होता आणि तेथे कोणतेही बांधकाम नव्हते. त्यानंतर या नाल्यातील तिवरांची कत्तल करत मोठया प्रमाणात भरणी करण्यात आली. जी बाब उघडकीस आली व घोलप हे बांगुर नगर पोलिसात तक्रार करण्यास गेले. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी संबंधित लोकांवर गुन्हे दाखल केल्याचे  पोलिसांनी त्यांना सांगत त्यांचाही जबाब नोंदविला. त्यानुसा बोगस कागदपत्रे बनवत नाल्यावर बांधकाम करण्यात आले. जोगळेकर नाल्यावर २०१७ साली ज्या आकाराचे बांधकाम पालिकेने तोडले, त्याजागी त्याहून दुप्पट मोठे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे पालिकेने त्याला परवानगी दिली का? असा सवाल उपस्थित करत घोलप यांनी थेट पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनाच लक्ष घालण्याची विनंती केली आहे.