ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या मानाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तीनचाकी आणि चारचाकी वाहनांपेक्षा उमेदवारांकडून दुचाकी वाहनांना प्राधान्य दिले जाते. काटकसर आणि परिणाम या दोनही दृष्टीने दुचाकी वाहने अधिक उपयुक्त आहेत. अशी उमेदवार व प्रचार व्यवस्थापकांची समजूत असून त्याचा जबर फटका रिक्षा आणि भाडोत्री कार व्यवसायीकांना बसला आहे.याबाबतचे अर्थकारण सांगतांना एका उमेदवाराच्या व्यवस्थापकाने सांगितले की, एक रिक्षा २४ तासांसाठी एका दिवसाला १,००० ते १५०० रुपये भाड्यापोटी आणि जर इंधनासह असेल तर २००० ते २५०० रुपये आकारते. कारसाठी हाच दर आसनक्षमता आणि इंधनानुसार रोजचे २५० ते ३०० किमी रंनींग होईल या दृष्टीकोनातून आकारला जातो. तो साधारणत: ४,०० ० ते ७,००० हजारापर्यंत जातो. याशिवाय टोलचा आणि ड्रायव्हरचा खर्च वेगळा त्यापेक्षा एवढ्याच खर्चात ५०० रुपये रोज इंधनाशिवाय किंवा ७०० रुपये रोज इंधनासह अशी दुचाकी घेतली तर ती परवडते. टोलचा खर्च नाही, ड्रायव्हरचा खर्च नाही त्यात इंधनाचा किफायतशीर वापर एका मोटारसायकलवर तीनजण प्रचाराच्या वेळी बसतात. शिवाय वाहतूककोंडी होण्याचा प्रश्नच नाही. कुठल्याही गल्ली बोळातून त्या सुसाटच जातात. शिवाय तीचाकी आणि चारचाकी वाहनाचा प्रचारासाठी वापर करण्याआधी त्याची तशी नोंदणी आरटीओकडे करावी लागते. ते झेंगट या दुचाक्यांच्याबाबत नसते. त्यांचा प्रचार आणि रॅली असा दुहेरी वापर सहज करता येतो. शिवाय ज्यांच्याकडे दुचाकी आहे पण कामधंदा नाही अशी युवा मंडळी अशा स्वरूपात आपल्या दुचाक्यांचा वापर करू देण्यास स्वेच्छेने तयार असतात. परिणामी यावेळी चारचाकी आणि तीनचाकी वाहनांची प्रचारासाठीची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे.विशेषत: ज्यांनी या काळात आपल्या वाहनांना भरपूर मागणी असेल या अपेक्षाने नेहमीच्या करारातून तात्पुरती काढून घेतली. त्यांची अवस्था दादाही गेला दशम्याशी गेल्या अशी झाली आहे. त्यामुळे इलेक्शनच्या काळात चारचाकी वाहनांच्या मालकांकडे उमेदवार आणि प्रचारव्यवस्थापक घिरट्या घालायचे. तर या वेळी मात्र, उलटी स्थिती आहे. पैसे नंतर द्या पण वाहन भाड्याने घ्या अशी आर्जवे करण्याची वेळी चारचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या मालकांवर आलेली आहे.(विशेष प्रतिनिधी)
चारचाकी पिछाडीस, दुचाकी आघाडीवर
By admin | Updated: October 7, 2014 00:20 IST