सागर नेवरेकर मुंबई : दहिसर नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधून पाणी अडविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी साठविण्यास आणि भूजलाची पातळी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे नदीच्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल, तिथे कोल्हापुरी बंधारे बांधण्याची परवानगी नुकतीच महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली. त्यानुसार, रिव्हर मार्च आणि टंडन कमिटीच्या झालेल्या बैठकीत दहिसर नदीवर आणखी चार कोल्हापुरी बंधारे बांधण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून, काँक्रिटऐवजी रबर, टायरचा वापर करून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात येणार आहे.
रिव्हर मार्च टीमचे सदस्य विक्रम चोगले यांनी यासंदर्भात सांगितले की, महापालिका अधिकारी, टंडन कमिटी आणि रिव्हर मार्च यांच्यामध्ये नुकतीच संयुक्त बैठक संपन्न झाली. बैठकीच्या चर्चेनुसार, दहिसर नदीवर दुसरा कोल्हापुरी बंधारा हा दौलतनगर परिसरात बांधण्यात येणार आहे. त्याप्रमाणे नदीच्या दीड किलोमीटर अंतरावर तीन बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. दहिसर नदीवरील कोल्हापुरी बंधाºयासारखे बंधारे मुंबईतील तिन्ही नद्यांवर बांधण्यासाठी महापालिकेने हिरवा कंदील दिला आहे. परंतु दहिसर नदीवरील पहिला बंधारा हा काँक्रिटचा असून आता महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिलेल्या आदेशानुसार नद्यांवर काँक्रिटायझेशन बांधकाम करण्यास मनाई आहे.
रिव्हर मार्च टीमचे सदस्य गोपाळ झवेरी यांनी सांगितले की, दहिसर नदीवरील दुसºया बंधाºयाबाबत टंडन कमिटीने सुचविल्याप्रमाणे, रबर किंवा वाहनांचे टायर वापरून बंधारा बांधण्याची कल्पना आहे. रिव्हर मार्च टीमने टंडन कमिटीकडे रबर बंधाºयाचे सादरीकरण येत्या १० दिवसांत सादर करण्याची मागणी केली आहे. दहिसर नदीवरील रबरचा बंधाºयाचा हा प्रयोग अपयशी होऊ नये यासाठी रिव्हर मार्च टीम लक्ष देणार आहे. रबरचा बंधारा निकामी ठरला तर आता जो दहिसर नदीवरील पहिला बंधारा यशस्वी झाला आहे त्याप्रमाणे नदीमध्ये उर्वरित बंधारे बांधले जावेत, अशी मागणी रिव्हर मार्च टीमने महानगरपालिकेकडे केली आहे.