Join us  

रेनॉल्ड्स कॉलनीतील तोफा शिवडी किल्ल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 2:32 AM

वडाळ्यातील रेनॉल्ड्स कॉलनीमध्ये खितपत पडलेल्या दोन इतिहासकालीन तोफा ‘लोकमत’ने सह्याद्री प्रतिष्ठानच्या मदतीने पुरातत्त्व खात्याच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.

मुंबई : वडाळ्यातील रेनॉल्ड्स कॉलनीमध्ये खितपत पडलेल्या दोन इतिहासकालीन तोफा ‘लोकमत’ने सह्याद्री प्रतिष्ठानच्या मदतीने पुरातत्त्व खात्याच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. अखेर पुरातत्त्व खात्याने या तोफांची पाहणी केल्यानंतर, रविवारी, २४ जून रोजी सकाळी १० वाजता या दोन्ही तोफा शिवडी किल्ल्यावर हलविण्याचा निर्णय घेतला आहे.सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले की, ६ मार्च २०१८ रोजी सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य आणि वडाळा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परशुराम कार्यकर्ते यांनी या दोन बेवारस तोफांची पाहणी केली. या तोफा संरक्षित करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने राज्य पुरातत्त्व विभागाकडे पत्रव्यवहार केला. ‘लोकमत’ने वृत्तामधून या तोफांची वाताहत निदर्शनास आणली होती. या तोफा १७व्या शतकातील पोर्तुगीज बनावटीच्या असून, याचे वजन ८ ते १० टन एवढे आहे. या तोफा एके काळी मुंबईमधील शिवडी किल्ला डोंगरी किल्ला येथे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच तोफांच्या संरक्षणासाठी त्या शिवडी किल्ल्यावर ठेवण्याची परवानगी राज्य पुरातत्त्व विभाग संचालक डॉ. तेजस गर्गे आणि सहसंचालक भा. वि. कुलकर्णी यांनी दिली आहे.दरम्यान, याच काळात कर्नाक बंदर येथेही २ तोफा निदर्शनास आल्या होत्या. त्या संदर्भात पत्रव्यवहार केल्यानंतर, संबंधित तोफा राज्य पुरातत्त्व विभाग कार्यालयात ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती, प्रतिष्ठानचे मुंबई संपर्क प्रमुख विनय कताळकर यांनी सांगितले. दुर्गप्रेमींनी या तोफा हलविण्यासाठी मोहिमेत सामील होण्याचे आवाहन कताळकर यांनी केले आहे.