Join us  

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

By मनोहर कुंभेजकर | Published: May 09, 2023 7:13 PM

मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहराचे माजी महापौर, माजी नगरसेवक प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांना काल रात्री अचानक अस्वस्थ जाणवू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ व्हीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर, मुलगा प्रसाद, मुलगी प्रांजल असा परिवार आहे. वांद्रे पूर्व टीचर्स कॉलनी जवळील स्वर्गद्वार संयुक्तिक स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात सायंकाळी 5.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख, आमदार, माजी मंत्री अँड. अनिल परब हे मध्यरात्री पासून त्यांच्या कुटुंबासमवेत होते.

दरम्यान दुपारी त्यांचे पार्थिव त्यांच्या सांताक्रूझ पूर्व ,साईप्रसाद सोसायटी,गोळीबार रोड,तिसरा मजल्यावर त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. मग दुपारी पावणेचारच्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या सांताकृझ पूर्व,पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात ठेवण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घरी जावून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

विभागप्रमुख, आमदार, माजी मंत्री अँड. अनिल परब, मुंबई काँगेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, आमदार संजय पोतनीस,आमदार सुनील प्रभू, आमदार रवींद्र वायकर, उपनेते डॉ. विनोद घोसाळकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, महिला विभाग संघटक राजुल पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसेच मुंबईकरांनी शोकाकूल वातावरणात त्यांच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन घेतले.

दुपारी 4.40 मिनीटांनी राजे संभाजी विद्यालयातून फुलांनी सजवलेल्या वैकुंठयान शवाहिनीत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले.येथून शोकाकूल वातावरणात निघालेली त्यांची अंत्ययात्रा दुपारी 5.10 मिनीटांनी वांद्रे पूर्व, टीचर्स कॉलनी, स्वर्गद्वार संयुक्तिक स्मशानभूमीत पोहचली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांचा पुत्र प्रसाद यांनी अंत्यसंस्कार केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुंबईकरांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांचा परिचय

मुंबई महापालिकेत सर्वात उच्च शिक्षित, विनम्र आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती. सांताक्रूझ मधील राजे संभाजी विद्यालयाचे ते माजी प्राचार्य होते. तीन वेळा नगरसेवक झालेले महाडेश्वर २००२ साली पहिल्यांदा मुंबई महापालिकेत निवडणूक आले.दि, ८ मार्च २०१७ रोजी त्यांनी मुंबईच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारला होता. मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत महाडेश्वर मुंबईचे महापौर होते. 2002 ते 2007,2007 ते 2012,2017 ते 2022 या काळात तर तीन वेळा त्यांनी नगरसेवक पद भूषवले होते.15 एप्रिल 1960 साली त्यांचा जन्म झाला होता.2019 मध्ये वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती,मात्र त्यांना काँग्रेसच्या झिशान सिद्धीकी यांच्या विरोधात हार पत्करावी लागली होती.कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती.विभागप्रमुख-आमदार अँड.अनिल परब यांचे ते जवळचे सहकारी होते.

टॅग्स :विश्वनाथ महाडेश्वरमुंबईहृदयविकाराचा झटका