Join us  

नरिमन पॉईंटमधील ‘ती’ सदनिका आयकर विभागाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाचे (महारेरा) अध्यक्ष तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी सल्लागार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाचे (महारेरा) अध्यक्ष तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी सल्लागार अजोय मेहता यांची एक सदनिका आयकर विभागाच्या रडारवर आली आहे. मेहता यांनी गेल्या वर्षी नरिमन पॉइंट येथे खरेदी केलेली ही मालमत्ता आधीच्या मालकाने बनावट कंपनी स्थापन करून विकत घेतल्याचा संशय आयकर विभागाला आहे.

अजोय मेहता यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नरिमन पॉइंट येथील समता को ऑपरेटिव्ह सोसायटीत १ हजार ७६ चौरस फुटांची सदनिका खरेदी केली. पुण्यातील अनामित्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडकडून विकत घेतलेल्या या मालमत्तेची किंमत तब्बल ५ कोटी ३३ लाख इतकी आहे. ७ जुलै २०२१ रोजी आयकर विभागाने अनामित्रा प्रॉपर्टीजला नोटीस पाठवून समभागधारकांबद्दल विचारणा केली.

आयकर खात्याच्या बेनामी मालमत्ता विभागाच्या नोटिसीनुसार, अनामित्रा प्रॉपर्टीजने या कंपनीचे दोन भागधारक असल्याचे म्हटले आहे. कामेश सिंह आणि दीपेश रवींद्र सिंह अशी त्या दोघांची नावे असून, कामेशच्या नावावर कंपनीचा ९९ टक्के हिस्सा आहे. मात्र तो मुंबईतील एका चाळीत राहतो; तर दीपेश याने २०२०-२१ या आर्थिक वर्षातील विवरणपत्रात आपले उत्पन्न १ लाख ७१ हजार असल्याचे म्हटले आहे. इतक्या कोटींची मालमत्ता खरेदी करण्यासाठी संबंधित भागधारकांचे उत्पन्न अत्यंत कमी असून दोघांनीही आपला या मालमत्तेशी संबंध नाकारला आहे. त्यामुळे अनामित्रा प्रॉपर्टीजने त्याबाबत खुलासा करावा, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

मेहता यांनी खरेदी केलेली ही मालमत्ता अनामित्रा प्रॉपर्टीजकडे मे २००९ पासून होती. ‘अनामित्रा’ने ती चार कोटी रुपयांना खरेदी केली होती. त्यासाठी शेल कंपनीची स्थापना करण्यात आली होती. त्यात उपरोक्त दोन भागधारक दाखविण्यात आले होते. मात्र, इतके अल्प उत्पन्न असलेल्या व्यक्ती करोडो रुपये मिळकत असलेली कंपनी कशी काय स्थापन करू शकतात, असा संशय आल्याने आयकर विभागाने अनामित्रा प्रॉपर्टीजला नोटीस पाठविली आहे.

प्रशासकीय अधिकारी म्हणून राज्य शासनात महत्त्वाची पदे भूषविलेल्या मेहता यांनी ही मालमत्ता खरेदी केल्याने हे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे. मेहता हे जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार होते. त्यानंतर त्यांच्याकडे महारेराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. मे २०१९ ते जून २०२० या काळात ते राज्याचे मुख्य सचिव होते, तर त्याआधी २०१५ ते २०१९ या काळात त्यांनी मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळली.

कायदेशीर व्यवहार!

याबाबत अजोय मेहता यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मी सदनिका खरेदी व्यवहार योग्य व कायदेशीरपणे केला आहे. बाजारभावाप्रमाणे त्याची रक्कम भरली आहे. त्यामुळे कंपनीच्या सत्यतेबद्दल पडताळणीची आवश्यकता भासली नाही. त्याच्याशी माझा संबंधही नाही.