The fishing ban period from June 1 to July 31 is dangerous for fishermen | १ जून ते ३१  जुलै मासेमारी बंदीचा कालावधी  मच्छिमारांसाठी ठरतो घातक

१ जून ते ३१  जुलै मासेमारी बंदीचा कालावधी  मच्छिमारांसाठी ठरतो घातक

मनोहर कुंभेजकर

मुंबई : गोराई गावातील लकी स्टार नावाची मासेमारी बोट बुडण्याची दुर्दैवी घटना घडली.तसेच सातपाटी बंदरात देखील बोट बुडाली.राज्यात मासेमारी बंदीचा कालावधी हा 1 जून ते 31 जुलै असा आहे. मात्र हा कालावधी मच्छिमारांसाठी घातक आणि जीवावर बेतणारा आहे. मासेमारीच नवा हंगाम 1 ऑगस्ट रोजी सुरु झाला पण तो मच्छीमार कोळी बांधवांना मात्र मारक ठरला असा सूर आता समाजबांधव व्यक्त करत आहेत.

बोट बुडून जाणारी जीवित हानी व अश्या दुर्घटना टाळण्यासाठी राज्यात मासेमारी बंदीचा कालावधी 10 जून ते 15 ऑगस्ट करावा अशी आग्रही मागणी मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेच्या अध्यक्ष राजेश्री भानजी यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांच्याकडे केली असून सदर मागणीचे निवेदन त्यांनी मत्स्यव्यवसाय आयुक्तांना दिले आहे.

मासेमारीचा कालावधी हा 1 ऑगस्ट ऐवजी जर 15 ऑगस्ट ही तारीख मासेमारी हंगाम करीता जाहिर केली असती आणि मच्छीमार कोळी बांधवांशी चर्चा करून व त्यांना विश्वासात घेऊन तर कदाचित वरील बोट दुर्घटना टाळता येऊ शकल्या असत्या 
असे मत त्यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले.

गोराई व सातपाटी येथील  दुर्घटना लक्षात घेता, खरच मच्छीमार कोळी बांधवांविषयी मत्स्यउद्योग खाते व प्रशाशन यांना काळजी वाटते का? 
कारण 2020 सालचा नवीन मासेमारी हंगाम हा 1 ऑगस्ट पासून सुरु झाला व मच्छीमार बांधवांना खोल समुद्रात मासेमारी करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र अद्याप समुद्र शांत झालेला नाही आणि चक्री वादळ - पाऊस वारा देखील सुरुच आहे, अश्यात 1 ऑगस्ट रोजी मासेमारीचा हंगाम सुरु केला तर मच्छीमारांच्या जिवाला धोका निर्माण होउ शकतो हे सरकार व मत्स्य विभागाला कळले नव्हते का? असा सवाल राजेश्री भानजी यांनी केला आहे.

 मासेमारी बंदी काळ म्हणजे मत्स्य प्रजजनाचा महत्वाचा काळ असतो. जून ,जुलै महिन्यात या महिन्यात मासळी अंडी टाकतात. त्यामुळे या काळात संपूर्ण महाराष्ट्र किनारपट्टी भागात मासेमारीवर सक्तिने बंदी पाहिजे व प्रशाशन यंत्रणेला जर कुणी मासेमारी करताना या काळात आढळले तर त्याच्यावर सक्त कार्यवाही करण्यात यायला हवी! पण असे प्रशासनाकडून दिसून येत नसल्याची टिका त्यांनी शेवटी केली.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The fishing ban period from June 1 to July 31 is dangerous for fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.