Join us  

आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला समुद्र; ७७ मुलांनी केली मुंबई शहराची सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 2:06 AM

नक्षलग्रस्त भागात राहणा-या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलिसांतर्फे ‘महाराष्ट्र दर्शन’ उपक्रम राबविण्यात येतो. शनिवारी या उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात राहणा-या ७७ मुलांना मुंबईत आणण्यात आले.

- अक्षय चोरगेमुंबई : नक्षलग्रस्त भागात राहणा-या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलिसांतर्फे ‘महाराष्ट्र दर्शन’ उपक्रम राबविण्यात येतो. शनिवारी या उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात राहणा-या ७७ मुलांना मुंबईत आणण्यात आले. या मुलांनी पहिल्यांदाच मुंबई आणि समुद्र पाहिला. समुद्र पाहिल्यानंतर आमचा आनंद गगनात मावत नव्हता, अशी प्रतिक्रिया मुंबई दर्शनासाठी आलेल्या मुलांनी ‘लोकमत’ला दिली.गेल्या चार वर्षांपासून महाराष्टÑ पोलिसांतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ही आतापर्यंतची १८ वी सहल होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या सहलीत ३८ विद्यार्थी आणि ३९ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. नक्षलग्रस्त भागात राहणारी मुले समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यांना या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्टÑ पोलिसांकडून केला जाणारा हा एक प्रयत्न आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या वेळी मुलांनी वानखेडे स्टेडियम, गिरगाव चौपाटी, गेट वे आॅफ इंडिया, विधान भवन, दादासाहेब फाळके चित्रनगरी, तारापोरवाला मत्स्यालय, नेहरू तारांगण, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, प्राणिसंग्रहालय, छोटा काश्मीर, एलिफंटा लेणी आणि पोलीस मुख्यालय अशा विविध ठिकाणांना भेटी दिल्या.टेलिव्हिजनवर पाहिलेल्या गोष्टी पहिल्यांदाच प्रत्यक्षात पाहत आहोत, असे एका विद्यार्थिनीने सांगितले, तर वानखेडे स्टेडियमवर आल्यावर सचिन तेंडुलकरची आठवण आल्याचे विद्यार्थी म्हणाले. या वेळी थ्री इडियट्समधील ‘वायरस’ अर्थात बोमन इराणी यांच्या अचानक भेटीने सर्व विद्यार्थी खूश झाले.गडचिरोलीबाहेर जाण्याचे स्वप्न या सहलीमुळे पूर्ण झाले. राजधानी पाहण्याचे, अथांग समुद्र पाहण्याचे भाग्य मिळाले.सर्व गोष्टी फक्त यापूर्वी टीव्हीवर पाहिल्या होत्या. प्रत्यक्षात पाहण्याचा योग या सहलीमुळे आला. पुन्हा एकदा मुंबईत यायला आवडेल. मुंबईने आणि मुंबईतल्या लोकांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.- संध्या कोवळे, ९ वीची विद्यार्थिनी,गाव - मेंढा टोला (गडचिरोली)मी गडचिरोली आणि नागपूरव्यतिरिक्त काहीच पाहिलेले नव्हते. आज पहिल्यांदा राज्याची राजधानी पाहिली. वानखेडे स्टेडियमवर स्थानिक खेळाडूंचा सामना पाहायला मिळाला. खेळाडूंची ड्रेसिंग रूम पाहायला मिळाली. वानखेडेवर आल्यावर २०१३ साली भारताने जिंकलेल्या विश्वचषकाची आठवण ताजी झाली. विधान भवनात गेल्यावर अधिवेशनाचे कामकाज कसे चालते, याबाबत आम्हाला माहिती देण्यात आली.आशिष सडमेक, १२ वीचा विद्यार्थी,गाव - भंगाराम फेटा (गडचिरोली)मी आयुष्यात पहिल्यांदाच गडचिरोलीबाहेर आलो आहे. पहिल्यांदा अथांग पसरलेला समुद्र पाहिला. यापूर्वी फक्त चित्रात आणि टेलिव्हिजनवरच समुद्र पाहिला होता. या वेळी आम्ही बोटीने प्रवास करत एलिफंटा लेणी पाहायला गेलो. समुद्रात गेल्यावर सर्वत्र पाणीच पाणी पाहत असताना किनारा दिसत नव्हता, तेव्हा भीती वाटत होती. पण मुंबईतली धावपळ मला आवडली नाही.अजय तुमरेटी, ९ वीचा विद्यार्थी,गाव - वटेली (गडचिरोली)शालेय सहलीनिमित्त एकदा नागपूरला गेले होते. त्यानंतर आज पहिल्यांदा गडचिरोलीबाहेर आले आहे. मुंबई पाहिली, समुद्र पाहिला, विधान भवन पाहिले, पेंग्विन पाहिले या सर्व गोष्टी आयुष्यात कधी पाहायला मिळतील, असे वाटले नव्हते. परंतु आज पाहताना स्वप्न तर पाहत नाही ना, असे वाटले. निळाशार समुद्र पाहून डोळे भरून आले होते. परंतु धावती मुंबई, मुंबईकरांकडे स्वत:साठी आणि इतरांसाठी वेळच नाही, येथे निवांतपणाच नाही. या गोष्टी मला खटकल्या.- माधुरी आत्रा, १२ वीची विद्यार्थिनी,गाव - गट्टा जामिया (गडचिरोली)

टॅग्स :मुंबई