Join us  

आधी निकाल लाेकसभेचा, नंतर मुंबई विद्यापीठ सिनेटचा, मतदानासाठी उरले १८ दिवस

By रेश्मा शिवडेकर | Published: April 03, 2024 12:48 PM

Mumbai University: मुंबई महापालिका निवडणुकांची ‘लिटमस टेस्ट’ समजली जाणारी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरील १० पदवीधरांच्या जागांवरील २१ एप्रिलला येऊ घातलेली निवडणूक पुन्हा एकदा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- रेश्मा शिवडेकर मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकांची ‘लिटमस टेस्ट’ समजली जाणारी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरील १० पदवीधरांच्या जागांवरील २१ एप्रिलला येऊ घातलेली निवडणूक पुन्हा एकदा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदानासाठी १८ दिवस उरलेले असतानाही विद्यापीठाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे आता थेट लोकसभेनंतरच या निवडणुकांचा ‘निकाल’ लागणार का, असा प्रश्न पदवीधरांना पडला आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सिनेटकरिता मतदान होणार होते. मात्र, मतदार नोंदणीत घोटाळा झाल्याच्या मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांच्या आरोपानंतर विद्यापीठाने निवडणूक स्थगित केली. प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार मतदार यादीची विद्यापीठ समितीकडून तपासणी करण्यात आली. शेलार यांच्या आरोपात तथ्य नसल्याचा निर्वाळा समितीने दिला असतानाही विद्यापीठाने ती यादी रद्द करून नव्याने नोंदणी प्रक्रिया राबविली. त्यानुसार साधारण १३ हजार पदवीधरांची नोंदणी झाली. मात्र २१ एप्रिलला अवघे काही दिवस उरले असताना प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाचा पत्ता नसल्याने सिनेट निवडणुकांचे भवितव्य अधांतरी आहे.

आधीच या सिनेटवरील पदवीधरांच्या कार्यकाळाची तीन वर्षे वाया गेली आहेत. अजूनही निवडणुका घेण्याबाबत काहीच हालचाल नाही. या निवडणुकांच्या आयोजनात आचारसंहिताही आड येत नाही. निर्णय घेण्याच्या दृष्टीने पूर्णपणे स्वायत्त असलेले विद्यापीठ निवडणुका घेण्याकरिता कुणाच्या आदेशाची वाट पाहत आहे? - प्रदीप सावंत, युवा सेना (उद्धव सेना), माजी सिनेट सदस्य.

७०० हरकतींवर निर्णयच नाहीविद्यापीठाने सिनेट निवडणुकांकरिता जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार २६ फेब्रुवारीला मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार होती तर २१ एप्रिल मतदानाची आणि २४ एप्रिल ही मतमोजणी करून निकाल जाहीर करण्याची तारीख ठरली होती. त्यानुसार एव्हाना निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक यायला हवे होते. मात्र, मतदारयादीवर आलेल्या सुमारे ७०० हरकतींवरच अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुढील प्रक्रिया खोळंबलेली आहे, असे विद्यापीठ प्रशासनातील एका अधिकाऱ्यांकडून कळले. या वेळापत्रकानुसार २९ फेब्रुवारीला निवडणूकीची अधिसूचना येणार होती. मात्र, मार्च उलटला तरी अधिसूचना निघालेली नाही. सिनेट निवडणुका घेण्याबाबत विद्यापीठ स्तरावर तयारीच सुरू नसल्याचे सूत्रांकडून समजले. 

टॅग्स :मुंबई विद्यापीठमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४