Join us  

अ‍ॅण्टॉप हिल येथे अग्निकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 1:20 AM

अग्निकांडात २२ दुचाकींसह एक टेम्पो, १ कार जळून खाक

मुंबई : अ‍ॅण्टॉप हिल येथील विजय नगर परिसरात पार्क केलेल्या दुचाकींना अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. मध्यरात्री घडलेल्या या अग्निकांडात २२ दुचाकींसह एक टेम्पो, १ कार जळून खाक झाली आहे. या प्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करीत अधिक तपास सुरू केला आहे.विजय नगर परिसरातील गणेश मंदिरासमोर स्थानिकांची १०० हून अधिक वाहने पार्क असतात. रात्री पावणे तीनच्या सुमारास एक तरुण दुचाकी पार्क करायला जाणार तोच त्याला वाहनांना आग लागल्याचे दिसून आले. त्याने, तेथीलच महेंद्र मुंजे यांचा दरवाजा ठोठावला. सुरुवातीला एका दुचाकीला लागलेली आग पार्क केलेल्या सर्व वाहनांना लागत गेली. यात पाहता पाहता एकामागोमाग एक वाहनांनी पेट घेतला.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांनी सतर्कता म्हणून घरातील गॅस बंद केले. तेथे पार्क असलेल्या वाहनांमध्ये सीएनजी गॅस असल्याने आधी ते वाहन विझविण्यासाठी महिलांनी घरातील हंडा, कळशीने पाण्याचा मारा केला. पहाटे ३ च्या सुमारास घटनेची वर्दी मिळताच वडाळा टी टी पोलीस तेथे दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवानही निघाले. अरुंद वाट त्यात पार्क केलेल्या वाहनांमुळे अग्निशमन दलाला आतमध्ये येण्यास अडचणी निर्माण झाल्या. कसेबसे आतमध्ये प्रवेश करीत त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शी महेंद्र मुंजे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.यात २२ दुचाकी, १ टेम्पो आणि एक कार जळून खाक झाली आहे. या प्रकरणी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करीत, अधिक तपास सुरूकेला आहे. परिसरातील सीसीटींव्हीचा शोध सुरू आहे. आग लागली की कोणी लावली? याचा तपास सुरू असल्याचे वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सांगळे यांनी सांगितले.नवीन वाहनांची राख...जळालेल्या वाहनांमध्ये नवीन महागड्या वाहनांचीही राख झाली. एक ते दोन महिन्यांपूर्वी हौशेनी घेतलेली वाहने यात जळाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. संजय मसुगडे या तरुणाने तर गेल्याच महिन्यात भाऊ इंजिनीअर झाला म्हणून त्याला दुचाकी घेतली होती. तर नारायण मेवाड यांचा टेम्पो आणि कार यात जळाली आहे. कर्जावर घेतलेल्या या वाहनांवर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. त्यामुळे त्यांनाही याचा फटका बसला आहे.