Join us  

अधिकृत बांधकाम पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल, शिवसेना नगरसेवक विरुद्ध साहाय्यक पालिका आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 7:33 AM

पालिकेच्या आर उत्तर विभागाच्या साहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांनी आर मध्य व आर उत्तरच्या प्रभाग समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे यांच्यासह नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि नगरसेवक हर्षद कारकर यांच्यावर २९ डिसेंबर रोजी रात्री एमएचबी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई : पालिकेच्या आर उत्तर विभागाच्या साहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांनी आर मध्य व आर उत्तरच्या प्रभाग समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे यांच्यासह नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि नगरसेवक हर्षद कारकर यांच्यावर २९ डिसेंबर रोजी रात्री एमएचबी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. संबंधित अधिकृत बांधकामांवरील कारवाई शिवसेनेच्या नगरसेवकांच्या दबावाखाली केल्याचे नांदेडकर यांनी म्हटले आहे. तर हा प्रकार भाजपा आमदाराच्या दबावाखाली होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.दहिसर पूर्व मराठा कॉलनी येथील ज्योती फैदी यांचे अधिकृत घर आणि येथील वैशाली पवार यांची संरक्षक भिंत साहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांनी गेल्या २६ डिसेंबरला तोडली. या प्रकरणी २८ डिसेंबरला दुपारी शिवसेनेने ५ तास त्यांच्या कार्यालयात घेराव घातला. त्यानंतर नजरचुकीने बांधकाम तोडल्याचा लेखी माफीनामा त्यांनी एसीपी आणि आमदार सुर्वे यांच्यासमोर लिहून दिला होता. तर शिवसेनेच्या दबावामुळे हा माफीनामा दिला असून हे पाडलेले बांधकाम बांधून देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे मराठा कॉलनीतील नागरिकांसह नगरसेवक कारकर यांनी पालिकेचा निषेध करण्यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत उपोषण केले. शीतल म्हात्रे यांनी ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणली असता, त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निरोप त्यांना पाठवा, अशी सूचना केली. त्यानंतर या उपोषणाची समाप्ती झाली.२९ डिसेंबला सभागृह नेते यशवंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार प्रकाश सुर्वे, प्रभारी विभागप्रमुख विलास पोतनीस, शीतल म्हात्रे आणि आर उत्तरमधील नगरसेवकासह शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक एकच्या शिष्टमंडळाने सायंकाळी आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन नांदेडकर यांच्या निलंबनाची मागणी केली. या प्रकरणी चौकशी करून संध्या नांदेडकर यांनी पाडलेले बांधकाम पालिका स्व-खर्चाने बांधून देणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.आता प्रभाग समिती अध्यक्षासह शिवसेनेच्या दोन नगरसेवकांविरुद्ध नांदेडकर यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यामुळे शिवसैनिकांनी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे. आर उत्तर विभागात शिवसेनेचे जास्त नगरसेवक असून शिवसेनेच्या खच्चीकरणासाठी दहिसर येथील भाजपा आमदार मनीषा चौधरी यांच्या दबावामुळे हा एफआयआर दाखल केला असल्याची चर्चा येथील शिवसैनिकांमध्ये आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांकडे दाद मागितली असून आपण या प्रकरणी दखल घेतल्याची माहिती महापौरांनी दिली.रस्ता रुंदीकरणहीमहत्त्वाचेमराठा कॉलनीतील डीपीतील रस्ता रुंदीकरण करण्यासाठी मी २०१६ ला पालिका प्रशासनाला पत्र दिले होते. या रस्त्यातील बाधित ज्योती फैदी यांना न्याय तर मिळायलाच हवा. दुसरीकडे दहिसर येथे होणारी वाहतूककोंडी आणि भविष्याचा विचार करून या रस्त्याचे रुंदीकरण होणेदेखील गरजेचे असल्याचे भाजपा आमदार मनीषा चौधरी यांनी सांगितले.‘माझा, भाजपाचा संबंध नाही’या घटनेशी माझा आणि भाजपाचा काडीमात्र संबंध नाही आणि भाजपाची ही संस्कृती नाही. शीतल म्हात्रे या हॉस्पिटलमध्ये असताना मी प्रथम धाव घेतली होती, याचे त्यांनी स्मरण ठेवणे गरजेचे आहे. प्रभाग समिती अध्यक्ष शिवसेनेच्या, महापौर शिवसेनेचे त्यामुळे त्यांनी या प्रकरणी पालिका उपायुक्त अशोक खैरे आणि पालिका आयुक्तांकडे न्याय मागायला हवा होता. साहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर या महिलेला ५ तास त्यांच्या कार्यालयात कोंडून ठेवणे कितपत योग्य आहे?- मनीषा चौधरी, भाजपा आमदार, दहिसरअद्याप अटक नाहीया प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तथापि, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अधिक चौकशी सुरू आहे.- अशोक जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एमएचबी पोलीस ठाणे

टॅग्स :मुंबई