Join us  

मुंबईत भेडसावणाऱ्या लसीकरणाच्या प्रश्नाबाबत लवकर मार्ग काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:07 AM

मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्रलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह राज्यात १ मेपासून १८ वर्षे व त्यापुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक ...

मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईसह राज्यात १ मेपासून १८ वर्षे व त्यापुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाईल, असे सरकारने जाहीर केले होते. परंतु, लसींचा साठा नसल्याने मुंबईकर लस घेण्यापासून वंचित राहिले आहेत. लसीचा साठा कमी असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मुंबईत केवळ नायर रुग्णालय, बीकेसी कोविड सेंटर, सेवन हिल्स रुग्णालय, कुपर रुग्णालय व राजावाडी रुग्णालय अशा पाचच केंद्रांवर लसीकरण सुरू असून, इतर खासगी व सरकारी केंद्र बंद आहेत. त्यामुळे लसीकरण मोहीम थंडावली आहे. सध्या सुरू असलेल्या लसीकरणाच्या गोंधळामुळे मुंबईतील नागरिक हवालदिल झाले असून, मुंबईत भेडसावणाऱ्या लसीकरणाच्या प्रश्नाबाबत लवकर मार्ग काढावा, अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

१८ ते ४४ वर्षे वयोगटाप्रमाणेच ४५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील लाखो मुंबईकरांसमोर लस कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच पहिली मात्रा घेतल्यानंतर एका विशिष्ट कालावधीत दुसरी मात्रा घेणे अपेक्षित आहे. परंतु, अतिशय कमी साठा व मोजकीच केंद्र खुली असल्याने दुसरी मात्रा देण्याची वेळ आलेल्यांची फरपट सुरू आहे. त्याचबरोबर ४५ वर्षांच्या पुढील वयोगटातील अनेक लोकांची पहिली मात्रा घेणेही बाकी आहे, तसेच पहिली आणि दुसरी मात्रा घेण्याकरिता ऑनलाईन वेळापत्रकात कुठलाही स्लॉट उपलब्ध नाही. साठाच नाही तर मग १ मेपासूनची घोषणा करण्याची घाई का केली? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असल्याचे किल्लेदार यांनी पत्रात म्हटले आहे.

लसीची दुसरी मात्रा कधी मिळणार, त्यासाठी अपेक्षित मुदत चुकल्यास पर्याय काय, सदर डोस चुकल्यास प्रतिकारशक्ती कमी तर होणार नाही ना, दुसरी मात्रा कधी मिळणार हे कळले तर बरे होईल, असे अनेक प्रश्न मुंबईकर उपस्थित करत आहेत. त्याचप्रमाणे १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी पाच केंद्र असल्याने फारच मर्यादा आल्या आहेत. लसीकरणासाठी लांबून येणाऱ्या लाेकांना त्रास हाेत आहे. लसीकरण घराजवळ करायला हवे, त्यासाठी केंद्रे वाढवायला हवीत, म्हणजे गर्दीही होणार नाही आणि लोकांची साेय होईल, अशी भूमिका त्यांनी पत्रात मांडली आहेल.

या सर्व बाबींचा संवेदनशीलपणे विचार करून मार्ग काढावा आणि जनतेला दिलासा द्यावा, अशी विनंतीही किल्लेदार यांनी केली आहे.

...................................