Join us  

शशांक राव यांच्या नेतृत्वाला आर्थिक बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 5:42 AM

बेस्ट उपक्रमात कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने, संप झाले. मात्र संप मोडण्याच्या अनेक प्रयत्नांनंतरही नऊ दिवस टिकून यशस्वी ठरलेला हा पहिलाच संप म्हणावा लागेल.

मुंबई : नियमित वेतन, बेस्ट अर्थसंकल्पाचे पालिकेत विलिनीकरण अशा विविध मागणींसाठी बेस्ट कामगारांचा गेल्या काही काळापासून आंदोलन सुरु होते. मात्र पाच महिन्यांपूर्वी कामगार नेते शंशाक राव यांनी पुकारलेला संप ऐतिहासिक ठरला. शिवसेनेच्या माघारानंतरही संप यशस्वी करुन कामगार चळवळीत त्यांनी आपले अस्तित्व निर्माण केले. बेस्ट अर्थसंकल्पाचे पालिका अर्थसंकल्पात विलिनीकरणाच्या निर्णयाने राव यांना अप्रत्यक्ष बळ मिळवून दिले आहे. त्यामुळे महापालिका आणि बेस्ट उपक्रमातील शिवसेनेच्या संघटनेसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे.

बेस्ट उपक्रमात कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने, संप झाले. मात्र संप मोडण्याच्या अनेक प्रयत्नांनंतरही नऊ दिवस टिकून यशस्वी ठरलेला हा पहिलाच संप म्हणावा लागेल. कामगार नेते शरद राव यांच्या निधनानंतर बेस्ट कामगारांचा हा पहिलाच मोठा संप. त्यांच्या वडिलांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे नेतृत्व नाकारल्यामुळे हा संप त्यांना कामगार चळवळीतून नामशेष करेल, असा दावाही केला जात होता. मात्र बेस्ट कृती समितीतर्फे सर्वच कामगार संघटना एकत्रित आल्याने शशांक राव यांच्या लढ्याला बळ मिळाले.

संप टिकून राहण्यामागे बोलवते धनी दुसरेच असल्याचा आरोपही शिवसेनेकडून झाला. या काळात भाजप सरकारचे मौनही शंकेला वाव देणारे ठरले. शरद राव यांनी भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यामुळे यावेळेस शशांक राव यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होती. शिवसेनेने माघार घेऊन या संपातून हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा डाव उलटून शिवसेनेच्या संघटनेतील सदस्यच राव यांच्या संघटनेकडे वळत असल्याचे बोलले जाऊ लागले.

राव यांच्या संपानंतर बेस्ट कामगारांच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी लवादाच्या मध्यस्थीने बैठका सुरु आहेत. त्याचवेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बेस्ट उपक्रमाला दरमहा शंभर कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय जाहीर केला. पालिकेने बेस्टचे पालकत्वही स्वीकारले आहे. त्यामुळे आता राव यांचे राजकीय वजन वाढले आहे.