Join us  

बारावीच्या निकालाचा मार्ग अखेर मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 6:19 AM

शिक्षणमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने तपासलेल्या उत्तरपत्रिका राज्य शिक्षण मंडळाकडे जमा न करण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई : शिक्षणमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने तपासलेल्या उत्तरपत्रिका राज्य शिक्षण मंडळाकडे जमा न करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे बारावीच्या ८० लाखांहून अधिक उत्तरपत्रिका शिक्षकांकडे पडून होत्या. त्यामुळे बारावीचा निकाल रखडण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र विद्यार्थी हित लक्षात घेऊन आणि शिक्षणमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आपल्या बहिष्कार आंदोलनाला स्थगिती दिल्याची माहिती सरचिटणीस संजय शिंदे यांनी दिली.शिक्षणमंत्र्यांनी मागण्या मान्य न केल्याने उत्तरपत्रिका न तपासण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परिणामी उत्तरपत्रिका मंडळाच्या कार्यालयातच पडून राहिल्या होत्या. यानंतर शिक्षणमंत्र्यांनी काही मागण्यांच्या आधारे शासन निर्णय जाहीर केला. तरीही काही मागण्या अपूर्ण राहिल्या होत्या. ने महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी २७ मार्च रोजी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. शिक्षणमंत्र्यांनी दोन दिवसांत आदेश काढण्याचे आश्वासन संघटनेस दिले होते. परंतु अनेक दिवस झाले तरीही आदेश निघाले नव्हते. सोमवारी संघटनेने शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्याच आश्वासनाची आठवण करून दिली व पुढील बैठक १७ एप्रिल रोजी वित्तमंत्र्यांसोबत होणार असल्याची माहिती दिली.>विद्यार्थी हितलक्षात घेतलेसरकारच्या धोरणामुळे ८० लाख तपासलेल्या उत्तरपत्रिका नियमकांकडे पडून आहेत व अजून काही दिवस आंदोलन लांबवल्यास बारावीचा निकाल वेळेत लावणे कठीण होईल. यामुळे विद्यार्थी आणि पालकांनाच जास्त मनस्ताप होईल आणि ते गैर ठरेल. त्यामुळे विद्यार्थीहित लक्षात घेऊन आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.- संजय शिंदे, सरचिटणीस, महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना