Join us  

अखेर धनश्रीला मिळाले ‘हृदय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 1:43 AM

जालना येथील सारवाडी गावच्या साडेचार वर्षांच्या धनश्री मुजमुले हिला दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शुक्रवारी नव्या ‘हृदया’च्या भेटीतून नवसंजीवनी मिळाली.

मुंबई : जालना येथील सारवाडी गावच्या साडेचार वर्षांच्या धनश्री मुजमुले हिला दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शुक्रवारी नव्या ‘हृदया’च्या भेटीतून नवसंजीवनी मिळाली. गेल्या वर्षी या चिमुरडीच्या हृदयाच्या गंभीर आजाराचे निदान झाल्याने, तेव्हापासून तिला महिन्यातून दोनदा रुग्णालयात दाखल करावे लागत होते. त्यानंतर, अखेर डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपण करावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर, प्रतीक्षा यादीत नाव नोंदविल्यानंतर जवळपास दीड महिन्यांनी औरंगाबद येथील एका १३ वर्षांच्या मुलाचे हृदय धनश्रीला प्रत्यारोपित करण्यात आले.गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून धनश्रीला श्वनसाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर, सतत महिन्यातून दोन वेळा तिला रुग्णालयात दाखल करावे लागत होते. तिला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी हा हृदयाचा गंभीर आजार आहे. त्यामुळे तिचे हृदय केवळ १५ टक्के कार्यरत होते. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी तिचे हृदय प्रत्यारोपण करावे लागेल, असा सल्ला दिला. या प्रत्यारोपणसाठी एकूण २५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अशी माहिती धनश्रीचे वडील कृष्णा मुजमुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.हृदय प्रत्यारोपणाचा सल्ला दिल्यानंतर, साधारण दीड महिन्यांपूर्वी जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीत याकरिता नोंदणी करण्यात आली. त्यानंतर, गुरुवारी अचानक हृदय उपलब्ध झाल्याचा दूरध्वनी आला. त्याप्रमाणे, शुक्रवारी पहाटे ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून धनश्रीला मुलुंड येथील रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी आणण्यात आले. शुक्रवारी दुपारी हे प्रत्यारोपण सुरू झाले. ते रात्री उशिरा पूर्ण झाले, असे धनश्रीच्या वडिलांनी सांगितले. या प्रत्यारोपणासाठी वाहतूक पोलीस, रुग्णालय प्रशासन, हवाई वाहतूक सेवा या यंत्रणांनी खूप साहाय्य केल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. हे प्रत्यारोपण हृदयप्रत्यारोपण प्रमुख डॉ. अन्वय मुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.धनश्रीचे वडील शेती करतात. शिवाय, जालन्याला त्यांचे आयुर्वेदिक औषधांचे दुकान आहे. त्यामुळे या प्रत्यारोपणासाठी आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष करीत आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.या रुग्णाकरिता टाटा ट्रस्टला केलेल्या विशेष विनंतीवरुन केवळ एका दिवसांत नऊ लाख रुपयांची मदत दिली आहे. तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने तीन लाख रुपयांची मदत केली आहे. याशिवाय, मिशन मुस्कान अंतर्गत रोटरी क्लबच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची मदत केली आहे.याप्रकरणी मुख्यमंत्री यांनी स्वत: लक्ष दिल्याने एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सेवाही रुग्णाला देण्यात आली, यासाठी शासनाने विशेषाधिकार वापरुन ही सेवा पुरविली. या सेवेचा खर्च वीस लाख रुपये इतका आहेस, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेट्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.