Join us  

मुंबईतील भजन मंडळांच्या तालमी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:50 AM

गणेशोत्सव सुरू झाला की सर्वत्र भजनांचे सूर कानावर पडतात आणि आपण भक्तीरंगात हरवून जातो.

- सागर नेवरेकर मुंबई : गणेशोत्सव सुरू झाला की सर्वत्र भजनांचे सूर कानावर पडतात आणि आपण भक्तीरंगात हरवून जातो. या काळात भजन मंडळांना मोठी मागणी असते. सार्वजनिक गणेशोत्सवात भजन सादर करण्यासाठी ही मंडळे मोठी ‘बिदागी’ आकारतात. मात्र, हे भजन सादर करण्याआधी त्यांनाही पूर्वतयारी करायला लागते. नव्या रचना, आधीच्या रचनांना नव्या चाली देणे, कोरस आणि इतर साथीदारांची तयारी करून घेणे, नव्या वादकांसोबत सराव करणे, कोणता अभंग कधी म्हणायचा इथपासून ते एक बारी किती वेळ चालवायची याची तालीम या मंडळांना करावी लागते. या साऱ्या प्रक्रियेनंतरच ही मंडळी सुस्वर भजन सादर करण्यासाठी तयार होतात. अशाच काही मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून भजन मंडळांच्या तालमीविषयी घेतलेला हा आढावा...आषाढी एकादशीपासूनच भजन मंडळे तालीम सुरू करतात. श्रावण महिन्यामध्ये सोमवार, गुरुवार आणि शनिवार अशा दिवसांत भजनाच्या सुपाºया अधिक येतात. त्यानुसार भजन मंडळांकडून सराव केला जातो. भजन मंडळात काम करणारी बरीच मंडळी ही विविध क्षेत्रांत चांगल्या पदावर काम करणारी आहेत. ३६५ दिवसांत जेवढे सण येतात तेव्हा भजने सुरू असतात. त्यामुळे आम्हाला विशेष सरावाची गरज भासत नसल्याची माहिती सातेरी देवी प्रासादिक भजन मंडळाचे बाळाजी नाईक यांनी दिली.साईच्छा भजन मंडळाचे अध्यक्ष योगेश देशमुख यांनी सांगितले की, साईच्छा भजन मंडळ हे इतर मंडळांपेक्षा वेगळ्या धाटणीचे आहे. गणेशोत्सवाच्या दोन ते तीन महिने अगोदरपासून बुकिंग सुरू होते. यंदा आम्ही यात भजनाबरोबर बँजोचा ताळमेळ साधण्याचा अनोखा प्रयत्न करणार आहोत. याचा सराव आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे गणपतीचे अकरा दिवस आणि नवरात्रीचे नऊ दिवस धावपळ असेल. भजन मंडळातील सगळी मंडळी विविध क्षेत्रांत कार्यरत असल्यामुळे मुंबईच्या बाहेर सुपारी घेतली जात नाही. विशेष म्हणजे भजन मंडळाच्या वतीने सामाजिक कार्येदेखील केली जातात. भजनाच्या माध्यमातून जेवढे मानधन मिळते, ते गाव, शाळा, आदिवासी पाडे आणि कर्करोग ग्रस्तांना मदत स्वरूपात दिले जाते. सामाजिक कार्यामुळे लोकांना आम्ही खूपच जवळचे वाटतो.>मुंबईतील मोठमोठी गणेशोत्सव मंडळे आम्हाला भजनासाठी आमंत्रित करत असतात. त्यांच्याकडून आम्ही ‘बिदागी’ घेत नाही. फक्त प्रवासासाठी लागणारा खर्च घेतो. कोणी आग्रह करून पैसे दिलेच तर त्यातून अन्नदान, आरोग्य आणि गरजूंना मदत केली जाते. त्यामुळे भजन मंडळांमध्ये पैशाचा व्यवहार हा येत नाही. काही ठिकाणी भजनाची बारी करताना धार्मिक आणि सामाजिक विषयावर भाष्य करणारी गाणी गायली जातात. महिन्यातून दोन वेळा तरी बाहेर कार्यक्रम असतो, त्यामुळे विशेष असा सराव करावा लागत नाही.- वसंत प्रभू, संचालक, ढोके मामापश्चिम रेल्वे प्रवासी भजन मंडळ, बोरीवली

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सव