'अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा महाराष्ट्रात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 04:02 PM2021-06-20T16:02:42+5:302021-06-20T16:04:57+5:30

विरोधकांनीही या कार्यक्रमावरुन राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

File charges against Ajit Pawar, otherwise withdraw all charges in Maharashtra, gopichand padalkar | 'अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा महाराष्ट्रात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्या'

'अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा महाराष्ट्रात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्या'

Next
ठळक मुद्देलोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण.. असं अजित पवारांची अवस्था आहे. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. 11 मार्च रोजी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या परीक्षांसाठी मी आंदोलन केलं, त्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल केला

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील शहर कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, याप्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका समोर असतानाही पक्षाच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी झाल्याने सोशल मीडियावरुन राष्ट्रवादीसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. भाजपा नेत्यांनीही आता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीला लक्ष्य केलं आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. 

एकीकडे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन अतिशय साध्या पद्धतीने ऑनलाईन बैठक घेऊन साजरा केला. मात्र, दुसरीकडे अजित पवारांच्या उपस्थितीतील ही तोबा गर्दी कोरोनाचे संक्रमण वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळेच, विरोधकांनीही या कार्यक्रमावरुन राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

'लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण.. असं अजित पवारांची अवस्था आहे. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. 11 मार्च रोजी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या परीक्षांसाठी मी आंदोलन केलं, त्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल केला, मला रात्री 3 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात ठेवलं. मग, जामीनावर सोडलं. अजित पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे,' अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच, आता संयोजकावर का गुन्हा दाखल करतायं, अजित पवारांची जबाबदारी होती, कारण ते तिथं होते,  हा कार्यक्रम लोकहिताचा नसून तुमच्या पक्षाचा होता, असेही पडळकर यांनी म्हटले. 

विकेंड लॉकडाऊन आहे, गर्दी करू नका, असं स्वत:च प्रेस घेऊन सांगतात आणि गर्दीच्या कार्यक्रमाला तेच जातात. आता, दिलगिरी व्यक्त करतात. सर्वसामान्य लोकांवर तु्म्ही गुन्हा दाखल करता, मग आता अजित पवार यांच्यावरही गुन्हा दाखल केला पाहिजे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रचारावेळीही आयोजकांवर गुन्हा दाखल केला होता. पण, अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झाले आहेत, तेवढे मागे घ्या, असेही पडळकर यांनी म्हटलं.

गर्दीचा व्हिडिओ व्हायरल

पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी टीकेची धनी होत आहे. विशेष म्हणजे खुद्द अजित पवारांनी देखील आपणच नियम करायचे आणि मोडायचे हे काही पटत नव्हते असे सांगतानाच तुम्ही नियमांचे पालन केले नाही, अशी खंतही या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली. मात्र, आता सोशल मीडियावर या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावरुन, राष्ट्रवादीसह अजित पवार यांच्यावर नेटीझन्सही टीका करत आहेत.  

विकेंड लॉकडाऊन असताना गर्दी

एकीकडे पुण्यात शनिवार आणि रविवारचा विकेंड लॉकडाऊन पुन्हा सुरू केला आहे. त्यामुळे, गर्दी टाळणे आणि सार्वजनिक कार्यक्रम न घेणे हे सातत्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीतील कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याने महाविकास आघाडी सरकारवरही टीका होत आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: File charges against Ajit Pawar, otherwise withdraw all charges in Maharashtra, gopichand padalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app