Join us  

सणासुदीच्या काळात एफडीएकडून साडेपाच हजार लीटर खाद्यतेल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 2:29 AM

आस्थापनांना नोटीस : प्रशासनाची कारवाई

मुंबई : सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासन विभागाने मुंबई शहर-उपनगरातून तब्बल ५ हजार ४४१ लीटर बनावट खाद्यतेल जप्त केले आहे. गणेशोत्सव, दसरा, नवरात्रौत्सव आणि दिवाळी या चार सणांच्या काळात ही धडक कारवाई करण्यात आली असून, सर्वांत मोठा हा बनावट खाद्यतेलाचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

आॅक्टोबर महिन्यात आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान शहर-उपनगरात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी मुंबईतील १३ झोनमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या १० सहायक आयुक्तांनी २६ अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या चमूच्या सााथ्ीने कारवाई केली आहे. यात खाद्यतेल, तूप, दुधाची उत्पादने, मिठाई, खवा, मावा, फरसाण, स्पेशल बर्फी आणि चॉकलेट्स या पदार्थांवर एफडीएने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत उत्पादक, वितरक आणि विक्रेते अशा सर्व आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. यात साधारण १ लाख ३४ हजार किमतीचा ६३७ किलो खवा, तर पाच लाख ३१ हजार रुपयांचे ५ हजार ४४१ लीटर खाद्यतेल व तूप, ६ लाख रुपयांची ३ हजार ८७१ किलो मिठाई आणि फरसाण, चॉकलेट्स व स्पेशल बर्फी यांचे एकत्रित १ हजार ७४३ किलोंचा ८२ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

कारवाईच्या दरम्यान, खव्याचे ७, खाद्यतेल व तुपाचे १६, मिठाईचे ३० तर अन्य चॉकलेट्स, स्पेशल बर्फी व फरसाणाचे १० नमुने जप्त करण्यात आले आहेत. हे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, तसेच या आस्थापनांना नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती एफडीएने दिली. ही कारवाई केल्याने भेसळयुक्त पदार्थांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे यापुढेही एफडीएने अशीच कारवाई सुरू ठेवावाी, अशी मागणी होतआहे़ 

टॅग्स :तेल शुद्धिकरण प्रकल्पमुंबईदिवाळी