Join us  

पंचावन्नावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन यंदा ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 12:48 AM

नवी दिल्ली येथील काउन्सिल ऑफ सायंटीफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे महासंचालक डॉ. शेखर मांडे या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत

मुंबई : मराठी विज्ञान परिषदेच्या पंचावन्नाव्या वार्षिक अधिवेशनाचे यंदा ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. १३ ते १७ डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन ऑनलाइन पद्धतीने साजरे होणार आहे. 

नवी दिल्ली येथील काउन्सिल ऑफ सायंटीफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे महासंचालक डॉ. शेखर मांडे या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. १३ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात लसनिर्मिती या विषयावर अध्यक्षीय भाषण होणार आहे. यानंतर तासकर लघुउद्योजक पुरस्कार, विज्ञान एकांकिका पुरस्कार, विज्ञानरंजन कथा पुरस्कार, गोडबोले गणित पुरस्कार, महाविद्यालयीन मुलांच्या संशोधनाचे पुरस्कार वेध-२०३५ पुरस्कार, मराठी विज्ञान परिषदेतून पीएचडी केलेल्या दीपंकर बिस्वास या पहिल्या विद्यार्थ्याचा सन्मान आणि सन्मानकर्‍यांचा सन्मान होणार आहे. यासोबतच दूरदृष्य माध्यमे : वापर-लाभ-अडचणी-मार्ग या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात डॉ. भूषण केळकर, डॉ. मेघश्री दळवी, दीप्ती त्रिवेदी, अजित जगताप हे सहभागी होणार आहेत. यानंतर विज्ञान एकांकिका स्पर्धेतील प्रथम पुरस्कारप्राप्त एकांकिकेचे सादरीकरण व विज्ञानरंजन कथा स्पर्धेतील बक्षीसप्राप्त कथा - ब्राह्मो-९ आणि शाश्वत विकास या सद्गुरू कुळकर्णी लिखित कथेचे वाचन होणार आहे.

१४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता महिला अभियंत्यांचे अनुभव या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात जालना येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या अध्यक्षा डॉ. स्मिता लेले, ओएनजीसीच्या हर्षिणी कान्हेकर व नासाच्या डॉ. अनिमा दिनेश पाटील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात https://mavipa.org/liveadhiveshan/ या लिंक वरून सहभागी होता येणार आहे.