Join us

सांगली जिल्ह्यात पंधरा टोळ्या सक्रिय-सिलिंडरचा काळाबाजार

By admin | Updated: August 18, 2014 23:35 IST

एजन्सींकडून मिळते अभय

सचिन लाड - सांगली --जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार आजही अत्यंत जोमाने सुरु आहे. गॅसचा हा काळाबाजार करण्यास खत-पाणी घालण्यात गॅस एजन्सींचीही महत्त्वाची भूमिका आहे. अनेकदा पोलिसांच्या तपासाची चक्रे एजन्सीच्या दिशेने फिरली. तपास मुळापर्यंत कधीच गेला नाही. दोन महिन्यातून एकदा तरी पोलिसांकडून जिल्ह्यात कुठे-ना-कुठे सिलिंडरचा साठा पकडला जातोच. संशयितांना अटक केली जाते, मात्र पुढे काय? चार-आठ दिवसात संशयित जामिनावर बाहेर येतात आणि त्यांची पावले पुन्हा या काळ्याबाजाराच्या दिशेने पडतात. जिल्ह्यात काळाबाजार करणाऱ्या किमान १५ टोळ्या सक्रिय असल्याची कबुली खुद्द पोलिसांनीच दिली आहे. यावरुन काळ्याबाजाराचे हे मायाजाल दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. नागरिक गप्प का?भरवस्तीत सिलिंडरचा साठा केला जातो. भरलेल्या सिलिंडरमधील गॅस मोकळ्या सिलिंडरमध्ये भरला जातो. खुलेआम व उघडपणे मृत्यूच्या दाढेत जाऊन हा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेजारी-पाजारीही हा व्यवसाय कसा सुरु आहे, हे पाहतात. मात्र तो बंद करण्यासाठी आवाज उठविण्याचे कोणी धाडस करीत नाही. परिणामी या लोकांचे कुटुंबासह मृत्यूच्या दाढेत वास्तव्य सुरु आहे. मिरजेत दोन महिन्यांपूर्वी हा व्यवसाय सुरु असलेल्या अड्ड्यावर स्फोट झाला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असूनही गॅस भरुन देण्याचा व्यवसाय बंद झालेला दिसत नाही.काळाबाजार होतो कसा?एजन्सीकडे घरपोच सिलिंडर पोहोच करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगार आहेत. या कामगारांशिवाय ग्रामीण भागात तथाकथित एजंट निर्माण झाले आहेत. एखादे कुटुंब लहान असेल आणि त्यांना दोन महिन्यातून एकच सिलिंडर लागत असेल, तर हे एजंट त्यांची गॅस पुस्तिका स्वत:कडे घेऊन ठेवतात. तुम्हाला लागेल त्यावेळी आम्ही सिलिंडर पुरवू, अशी हमी देतात. यामुळे ही कुटुंबेही आपला वेळ वाचेल, असा विचार करतात. कुटुंबाला वर्षातून सहा सिलिंडर लागत असतील, तर उरलेली सहा सिलिंडर हे एजंट घेतात. त्यांची ते तिप्पट दराने विक्री करतात. एजन्सीकडे घरपोच सेवा पुरविणाऱ्या कामगारांकडूनही असाच प्रताप सुरु आहे. अलीकडे वाहनात गॅसकिट बसविण्याचा फंडा वाढला आहे. गॅसचे पंप आहेत. मात्र पंपावरील गॅसने मायलेज मिळत नसल्याने घरगुती सिलिंडरमधील गॅस वापरला जात आहे. गॅसचा काळाबाजार होण्यामागे गॅसकिटची वाहनेच कारणीभूत आहेत. यातून काळाबाजार करणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या. या टोळ्या मग घरगुती सिलिंडर मिळविण्यासाठी वाट्टेल ते करीत आहेत. यासाठी काही एजन्सींनीही हातभार लावल्याचे पोलिसांच्या तपासात अनेकदा निष्पन्न झाले आहे. पोलिसांचा तपास का थंडावतो..?पोलिसांकडून दोन महिन्यातून एकदा तरी सिलिंडरचा साठा पकडण्याची कारवाई केली जाते. संशयितांना अटक केली जाते. त्यांच्याकडून ग्राहकांच्या गॅस पुुस्तिका जप्त केल्या जातात. गॅस एजन्सींना नोटिसा पाठविल्या जातात. मात्र पुढे काहीच होत नाही. संशयित चार-आठ दिवसात जामिनावर बाहेर येतात. आर्थिक गणितांची आकडेमोडही होत असल्याने तपासही थांबतो. पोलीस आपले काही बिघडवू शकत नाहीत, असा काळाबाजार करणाऱ्यांचा समज झाला आहे. यामुळे कितीही कारवाई झाली तरी हा व्यवसाय थांबलेला दिसत नाही. उलट मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्याने हा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ज्या विभागाशी संबंधित हा विषय आहे, त्यांनीही पोलिसांना तपासात मदत करण्याची गरज आहे. मृत्यूशी खेळत लोक घरात सिलिंडरचा बेकायदा साठा करीत आहेत. त्यांच्यासह शेजारच्या लोकांच्याही जीवितास धोका आहे. यामुळे लोकांनीही असे कुठे अड्डे सुरु असतील तर त्याची माहिती द्यावी. सध्या सुरु असलेल्या सिलिंडरच्या काळ्याबाजार प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल. - दिलीप सावंत, जिल्हा पोलीसप्रमुख