Join us  

ताप दाह व काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:06 AM

=========भारतात वसंत व ग्रीष्म ऋतू हे दोन ऋतू उन्हाळा म्हणून मानले जातात. वसंत ऋतूचा कालावधी हा साधारणतः फेब्रुवारी ...

=========

भारतात वसंत व ग्रीष्म ऋतू हे दोन ऋतू उन्हाळा म्हणून मानले जातात. वसंत ऋतूचा कालावधी हा साधारणतः फेब्रुवारी उत्तरार्ध-मार्च-एप्रिल पूर्वार्ध असा मानला जातो. हा ऋतू तसा संमिश्र असतो. परंतु गेल्या कित्येक वर्षात तापमानात फार मोठी वाढ झाल्याने यावर्षी मार्च महिन्यातच पारा ४०.९ अंश सेल्सिअसच्या वर गेला व मार्च महिन्यातच ग्रीष्म ऋतू जाणवला. विसाव्या शतकातील सरासरी तापमानाचा विचार करता पृथ्वीचे तापमान २०११ ते २०२० या दशकात ०.८अंश सेल्सिअस इतके वाढले आहे. २०१५ ते २०२० ही वर्षे अत्याधिक उष्णतेच्या लाटांची ठरली असून २०२१ हे वर्षसुद्धा अति तापमानाचे व उष्णतेचे ठरणार आहे. या अंदाजाचा अनुभवही आला. एप्रिल व मे ही दोन्ही महिने अधिक दाहक असणार असून या दोन्ही महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. २०२१ चा जानेवारी महिना सुद्धा गेल्या १२१ वर्षातील सर्वात उष्ण महिना ठरला आहे. सामान्यतः या महिन्यात तीव्र थंडी असते.

हवामान बदलाचे विपरीत परिणाम जगभरातील तापमानावर होत आहेत. सर्वत्रच सरासरी तापमानात वाढ झाली आहे. यापूर्वी १९१९ मध्ये २२.१४ तर २०२० च्या जानेवारी महिन्यात २१.९३ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. उष्णतेच्या लाटांची सुरुवात २०१५ पासून झाली. २०१५ ते २० या पाच वर्षाच्या कालावधीत भारतात साडे तीन हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. २००० ते २०२० या २० वर्षाच्या कालावधीत जगभरात सुमारे ४ लाख ५० हजार लोक हवामान बदलामुळे मृत्युमुखी पडले आहेत. २०२१ च्या जागतिक हवामान जोखीम निर्देशांकानुसार जगातील अति धोकाग्रस्त देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर आहे. तापमान वाढ व उष्णतेच्या लाटेमुळे पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान होऊन नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल,अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी २८ मार्च १९५६ साली ४१.७ अंश,मार्च २०११ मध्ये ४१.५ अंश तर मार्च २०१३ मध्ये ४०.५अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेची लाट थांबविणे कठीण असल्याचे मत अनेक शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. या लाटेचा मानवी शरीर व मनावर मोठा, दूरगामी परिणाम होऊ शकतो.

यावर्षी आपणास आता कोरोनाच्या दुसऱ्या, तिसऱ्या लाटे बरोबरच उष्णतेच्या तापदाहेच्या लाटेचाही सामना करायचा आहे. उष्णतेच्या लाटेत मानसिक तामस या गुण/दोषाची वाढ होते, मेंदूच्या कार्यात अल्प बदल होतो व परिणामी याच काळात (उन्हाळ्यात)सर्व प्रकारच्या गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते. असे राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालानुसारही सिद्ध झाले आहे. या गुन्हेगारीत मुलांचे व तरुणांचे प्रमाण जास्त असते. याच काळात अयोग्य पदार्थांचे, पेयांचे सेवन केले जात असल्याने पोटात मळमळ होणे, उलट्या होणे, टॉन्सिल वाढणे-सुजणे, सर्दी, खोकला, घसा बसणे, पोटदुखी, डोकेदुखी, त्वचेचे विविध आजार, विषाणूजन्य ताप इ.आजारांचे प्रमाण वाढते. हे सर्व प्रकारच्या रुग्णालयातील अहवालावरून दिसून येते. म्हणूनच उन्हाळ्यात आहार, विहार जपून केला पाहिजे. विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर अत्यंत महत्वाचे आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर मानसिक व शारीरिक शक्तीचा ऱ्हास होतो. बल, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. उष्णते बरोबरच कोरोनाच्या या महासाथीत शारीरिक व मानसिक रोगप्रतिकारक शक्ती टिकविणे, कायम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या काळात नैसर्गिकच भूक कमी होत असल्याने पचनास हलका आहार घ्यावा.

- आहारात सामान्यतः गोड, आंबट व खारट रसयुक्त पदार्थांचा वापर अधिक करावा. ज्वारीची भाकरी, चपाती, भात हे अधिक खावेत.

- दूध,ताक,लोणी,तूप, श्रीखंड,बासुंदी,शहाळ्याचे पाणी,उसाचा रस,नीरा हे खावेत/ प्यावेत.

- नाचणीची आंबील दररोज सकाळी प्यालाभर प्यावी. याने शरीरातील उष्णता व रुक्षता कमी होते.

- कांदा अधिक खावा. कांदा थंड असल्याने तो या दिवसात शरीरात जी उष्णता होते, ती कमी करतो.

- तळलेले पदार्थ, शिळे अन्न पुन्हा पुन्हा गरम केलेले.- सर्व प्रकारची थंड पेये, आईस्क्रीम, अति थंड पाणी (सामान्य स्थितीत आल्यावर घेणे.)

- अधिक प्रमाणात मसाल्याचे पदार्थ. हे पदार्थ उष्ण असतात. या कोरोनाच्या काळात याचा वापर लोक अधिक करतात.

- शेंगदाणे, गूळ, खोबरे खावे. पाणी-म्हणजे जीवन. शक्यतो माठातील पाणी प्यावे. माठातील पाण्यात थोड्या प्रमाणात सुंठ,धने जिरे यांच्या पावडरी घालाव्यात. शक्यतो ताजे पाणी प्यावे.

झोप - शरीर व मनाच्या विश्रांतीसाठी दररोज ७ ते ८ तास झोप महत्त्वाची आहे. या दिवसात दिवसा झोपणे सुद्धा चांगले असते. शांत झोपेने रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयोगी असणाऱ्या "सायटोकाईन्स" या प्रथिनाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. विषाणू, जिवाणूंचा धोका कमी होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांत झोप महत्त्वाची आहे. शक्यतो उपयोग कमी प्रमाणात करावा.

याप्रमाणे शक्य तेवढा आहार घेऊन उष्णतेपासून स्वतःचे रक्षण करा व रोगप्रतिकारक शक्ती कायम राखण्याचा प्रयत्न करून कोरोना पासून दूर रहा. हवामानात मोठे बदल होत असल्याने ते आरोग्य व विकास यावर मोठा परिणाम करू लागल्याने अनेक अडचणी आता निर्माण होऊ लागल्या आहेत व भविष्यात त्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतील यात शंकाच नाही.

- डॉ. अंकुश जाधव