Join us

सण - उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवास टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली आहे, मात्र कोरोना विषाणू गेलेला नाही, असा पुनरुच्चार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली आहे, मात्र कोरोना विषाणू गेलेला नाही, असा पुनरुच्चार राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी केला आहे. मुंबईत रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीला निर्बंध शिथिलता कारणीभूत असून, लोकांनी निष्काळजीपणा करणे थांबविले पाहिजे, असेही डॉक्टरांनी नमूद केले. याखेरीज सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवास टाळण्याचा महत्त्वाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

मुंबईत पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होतेय, त्याची कारणे काय ?

निर्बंध शिथिल केल्यानंतर व रेल्वे प्रवास सुरू झाल्यानंतरही रुग्णसंख्या कमी होत असल्याने दिलासादायक चित्र होते. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढल्याने आणि लोक निष्काळजीपणा करत असल्याने रुग्ण वाढत आहेत. यंत्रणा आणि राज्य कोरोना टास्क फोर्स दैनंदिन रुग्णवाढीकडे लक्ष ठेवत असून, निर्बंध शिथिलतेमुळे ही संख्या पुढील सणासुदीच्या दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

काय खबरदारी घेतली पाहिजे ?

निर्बंध शिथिल झाले असल्याने 'कोरोना गेला' असे समजून आरोग्य नियमांकडे दुर्लक्ष करू नका, काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांत अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात प्रवास झाल्यास नवीन म्युटंटचा धोका आणि वेगाने संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात शक्यतो प्रवास टाळावा.

लहान मुलांना होणाऱ्या संसर्गात कशामुळे वाढ झाली आहे ?

लहान मुलांना झालेले निदान हा तिसऱ्या लाटेचा इशारा नाही. लहान मुलांमध्ये झालेले निदान एकत्र दाटीवाटीने राहत असल्याने अथवा कोरोनाविषयक नियमावलीचे पालन न केल्यामुळे झाले आहे. मात्र, बऱ्याचदा लहानग्यांच्या बाबतीत मोठी माणसे संसर्गाचे कॅरिअर असतात, या अनुषंगाने लहानग्यांसोबत वावरताना नियमांचे पालन व खबरदारी घेतली पाहिजे.

दीर्घकाळ संसर्ग कमी करण्यासाठी यंत्रणांनी काय तयारी केली आहे ?

कोरोनाचा प्रादुर्भाव दीर्घकाळ कमी करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रीट अर्थात चाचणी, शोध आणि उपचार या पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे. विशेषत: चाचण्यांचे प्रमाण कमी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यासोबतच ज्या ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागेल, तिथे लागलीच स्थानिक पातळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात.