सिकंदर अनवारे, दासगावऔद्योगिकीकरणामुळे शहरांचा आणि त्या विभागाचा विकास होत असतो. वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये लोकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात, त्यामुळे समृद्धी येऊन लोकांचे जीवनमान उंचावते. मात्र महाड औद्योगिक क्षेत्र वसाहतींमुळे सावित्री खाडीकिनाऱ्याच्या लोकांचे जीवन सुखकर होण्याऐवजी उद्ध्वस्त झाले आहे. कडधान्याचे कोठार म्हणून ओळख असलेल्या खाडीपट्ट्यातील सुमारे ६०० शेतकऱ्यांची शेतजमीन या रासायनिक सांडपाण्यामुळे नापीक बनली आहे.महाड तालुक्याच्या पूर्व बाजूस आणि मुंबई-गोवा महामार्गावरून बिरवाडी विभागाला जोडणाऱ्या रस्त्यावर महाड औद्योगिक वसाहत उभारली गेली आहे. या वसाहतीमध्ये अनेक रासायनिक कारखाने असून या कारखान्यांचे घातक रासायनिक सांडपाणी छुप्यामार्गाने नदीच्या पात्रात सोडले जाते. ही सावित्री नदी पुढे वाहत जाऊन बाणकोट खाडीला मिळते. हे घातकपाणी वाहून येत असल्याने सावित्री नदीच्या आजूबाजूला वसलेल्या गावांना धोका पोहोचला आहे. नदीपात्रात सोडलेल्या रासायनिक पाण्यामुळे सावित्री नदी प्रदूषित झाली आहे. अनेक प्रकारच्या रासायनिक पदार्थांमुळे सावित्री नदीचे पाणी दूषित व विषारी बनल्यामुळे जैवविविधता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वेळोवेळी सावित्री नदीत सोडण्यात येणाऱ्या घातक रासायनिक सांडपाण्यामुळे नदीतील मासे मरत असून किनाऱ्यालाही लागत आहेत, मात्र याकडे औद्योगिक क्षेत्र वसाहतीच्या प्रशासनाने आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे या परिसरातील मासेमारी व्यवसाय बुडाला आहे. नदीच्या काठालगत असलेल्या दासगाव, दाभोळ, वराठी, तेळंगे, जुई, कुंबळे आदींसह २५ ते ३० गावांना या रसायनाचा फटका बसला आहे. त्यांचा मासेमारीचा व्यवसाय पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. या परिसरामध्ये नदीकिनाऱ्यालगत खलाटीची भातशेती आहे.सावित्री नदीच्या उधाणाचे पाणी वर्षानुवर्षे या जमिनीवर आक्रमण करत असल्याने जमीन लागवडीच्या क्षमतेची राहिलेली नाही. कृषीखात्याच्या २०१० च्या सर्व्हेप्रमाणे या परिसरातील ७ गावांतील ६०० शेतकऱ्यांची १९८ हेक्टर जमीन नापीक झाली आहे.
‘सुपीक’ शेत बनले ‘नापीक’
By admin | Updated: March 31, 2015 22:25 IST