Join us  

‘भार्गवी मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 1:34 AM

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकणारी भार्गवी दुपारे (१८) हिचा १३ जून रोजी मुंबईतील सपना रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकणारी भार्गवी दुपारे (१८) हिचा १३ जून रोजी मुंबईतील सपना रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेस पाच महिने उलटूनही तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. भार्गवीच्या मृत्यूस जबाबदार रुग्णालयातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. रुग्णालय बंद करण्यात यावे, या मागणीसाठी घाटकोपर पूर्व येथील रमाबाई कॉलनीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भीम आर्मीतर्फे निदर्शने करण्यात आली. पंतनगर पोलिसांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.१३ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून सलग ८ दिवसांचे डॉक्टरांचे मोबाइल रेकॉर्ड तपासण्यात यावे. रुग्णालयाचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात यावे. भार्गवीच्या मृत्यूचा तपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावा. भार्गवीच्या कुटुंबीयांना २ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी़ कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. भार्गवीच्या वडिलांनी संगितले, पंतनगर पोलिसांवर माझा विश्वास नाही. या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा. दोषी डॉक्टरांना अटक करण्यात यावी. पंतनगर पोलीस ठाण्यातील फौजदारांना निलंबित करण्यात यावे. घाटकोपर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कुंडलिक निगडे यांनी संगितले, भार्गवीच्या कुटुंबीयांचा जबाब आम्ही नोंदवला आहे. वैद्यकीय अहवाल व शवविच्छेदन अहवालानुसार तपास सुरू आहे. कुटुंबीयांचे दावे व मागण्या लक्षात घेता गरज पडल्यास पुढील तपास सीआयडीकडे सोपवला जाईल.