Join us  

नॉनकोविड रुग्णांना रुग्णालयात जाण्याची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 1:20 AM

वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले निरीक्षण: सरकारी, खासगी आरोग्यसेवा हळूहळू पूर्वपदावर

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे, अनेक रुग्णालये-नर्सिंग होमचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर झाल्याने एप्रिल-मे-जून मध्ये नॉनकोविड रुग्णांचे मोठे हाल झाले. त्यातही शस्त्रक्रिया आणि अवयव प्रत्यारोपणावर मोठा परिणाम झाला होता. पण, आता मात्र अनलॉकमध्ये नॉनकोविड रुग्णांना दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे. परंतु कोविडच्या भीतीने या रुग्णांनी रुग्णालयात जाण्याची धास्ती घेतल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे.मुंबईत कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे, परिणामी पालिका, शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनासह अन्य बाह्यरुग्ण विभाग सुरू झाले आहेत. मात्र या बाह्यरुग्ण सेवांना पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जुलै आणि आॅगस्टमध्ये शस्त्रक्रियांमध्ये वाढ झाली असली तरी नेहमीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ३० ते ४० टक्के एवढेच आहे. रुग्णालयात कोविड आणि नॉनकोविड रुग्णांसाठी वेगळा कक्ष आहे. तरीही भीतीमुळे अनेक रुग्ण रुग्णालयात न जाता छोट्या छोट्या क्लिनिक्समधून फक्त सल्ला व तिथेच उपचार घेणे पसंत करत आहेत, असे भाटिया रुग्णालयाचे संचालक डॉ. आर. दस्तुर यांनी सांगितले.मसिना रुग्णालयात महिन्याला जवळपास ७०० शस्त्रक्रिया आणि इतर प्रक्रिया केल्या जात असत. मात्र, सध्या केवळ अत्यावश्यक रुग्णांवरच शस्त्रक्रिया केल्या जात असून त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात एका महिन्यापूर्वी नॉनकोविड रुग्णांसाठी वेगळे ३० बेड राखीव ठेवले होते.मात्र तेव्हापासून एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. नॉनकोविड रुग्णांसाठी पालिका, शासकीय व खासगी रुग्णालयात खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र सामान्यांच्या मनात कोरोनाची मानसिक भीती इतकी आहे, त्यामुळे हे रुग्ण रुग्णालयात येण्यासाठी धजावत नसल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. परंतु, पुढच्या काळात हळूहळू ही परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे डॉ. जोशी यांनी सांगितले. याखेरीज, कोरोनामुळे खंड पडलेल्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही विशेष नियमावलीचा अवलंब करून झाल्या आहेत. अवयवदानासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या व्यक्तींना जीवनदान मिळणार आहे.