फादर स्टॅन स्वामी यांचं निधन; एल्गार परिषद, कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अटकेत असताना घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 07:24 AM2021-07-06T07:24:14+5:302021-07-06T07:25:41+5:30

डिसेंबर २०१७ मध्ये कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ९ ऑक्टोबर २०२० मध्ये फादर स्टॅन स्वामी यांना रांची येथील घरातून अटक केली.

Father Stan Swamy dies Elgar Parishad Koregaon Bhima | फादर स्टॅन स्वामी यांचं निधन; एल्गार परिषद, कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अटकेत असताना घेतला अखेरचा श्वास

फादर स्टॅन स्वामी यांचं निधन; एल्गार परिषद, कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अटकेत असताना घेतला अखेरचा श्वास

googlenewsNext

मुंबई: एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी (८४) (Father Stan Swamy) यांचे निधन झाले. वांद्रे येथील हॉली फॅमिली रुग्णालयात सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्यांना ९ ऑक्टोबर २०२० रोजी रांची येथून अटक केली होती.

स्वामी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा वैद्यकीय अहवाल ब्रीच कॅण्डी रूग्णालयाने सादर केल्यानंतर उच्च न्यायालयाने २ मे रोजी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. कोरोना पश्चात आजार बळावल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. हॉली स्पिरीट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, सोमवारी दुपारी १ वाजून २४ मिनिटांच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

स्टॅन स्वामी यांच्या निधनावर उच्च न्यायालयाने शोक व्यक्त केला. ही बातमी ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. सांत्वन करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत, असे न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने म्हटले. एनआयएने स्वामी यांच्यावर वेळेत उपचार करण्याबाबत हलगर्जीपणा केला. याची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी स्वामी यांचे वकील मिहीर देसाई  यांनी केली.

स्वामी यांचे कुटुंब नसल्याने त्यांचे पार्थिव सेंट झेवियर्स कॉलेजचे निवृत्त प्राचार्य फादर फ्रेझर मस्कारेनहास यांच्याकडे द्यावे व मुंबईत कोरोना आपत्ती काळातील प्रामाणिक कार्यप्रणालीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात यावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.

स्वामी यांची रविवारपासून प्रकृती खालावल्याने त्यांच्या वकिलांनी जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. न्यायालयाने दुपारी अडीच वाजता सुनावणी 
ठेवली. ती सुरू झाल्यावर एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी तातडीच्या सुनावणीवर आक्षेप घेतला. 

त्यावर स्वामी यांचे वकील देसाई यांनी होली रुग्णालयाचे डॉ. डिसूझा यांना एक मिनिटं बोलू द्या, अशी विनंती केली. डॉक्टर डिसूझा यांनी न्यायालयाला सांगितले की, “स्वामी यांना ४ जुलै रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ते शुद्धीवर आलेच नाहीत. त्यांना दुपारी (सोमवारी) मृत घोषित करण्यात आले. ते कोरोनातून बरे झाले. मात्र  फुफ्फुसातील गुंतागुंत वाढली. न्यूमोनियही झाला होता.”

एनआयएने अटक का केली? 
डिसेंबर २०१७ मध्ये कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ९ ऑक्टोबर २०२० मध्ये फादर स्टॅन स्वामी यांना रांची येथील घरातून अटक केली. प्रतिबंधित भाकपशी (माओवादी) संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील ही सोळावी अटक होती. या हिंसाचार प्रकरणातील सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गॅडलिंग, अरूण फरेरा, वर्णन गोन्झाल्विस, हनी बाबू, शोमा सेन, महेश राऊत, वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्याशी स्वामी संपर्कात होते, असा आरोप एनआयएकडून करण्यात आला होता.

फादर स्टॅन स्वामी परिचय
- मानवाधिकार कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या स्टॅन स्वामी यांचा जन्म २६ एप्रिल १९३७ रोजी तामिळानाडूमधील त्रिची या शहरात झाला. फिलिपाईन्समध्ये त्यांनी समाजशास्त्र आणि धर्मशास्त्रमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
- तेथे त्यांनी समाजातील वंचित घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. बंगळुरू येथील भारतीय सामाजिक संस्थेचे १९७५ ते १९८६ या काळात त्यांनी संचालकपद भूषविले.
- गेल्या काही दशकांपासून ते झारखंडमध्ये स्थायिक झाले होते. तेथे त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी मोठा लढा उभारला. झारखंडच्या तुरुंगांमध्ये बंदिवान असणाऱ्या हजारो आदिवासींच्या सुटकेसाठी त्यांनी न्यायालयात आवाज उठवला.  झारखंडमधल्या तत्कालीन सरकारने ‘लँड बँके’ची केलेली निर्मिती याला त्यांनी कडाडून विरोध केला होता.
- आदिवासी, दलित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी फादर स्टॅन स्वामींनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांच्या जाण्याने अतिव दुःख होत आहे.
- डॉ. स्टॅनिस्लॉस डिसोझा, स्टॅन स्वामी यांचे मित्र तथा जेसीयुट्स ऑफ इंडियाचे सभासद
 

Web Title: Father Stan Swamy dies Elgar Parishad Koregaon Bhima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.