Join us

ख्यातनाम कायदेतज्ञ टी.आर. अंध्यारूजीना यांचं निधन

By admin | Updated: March 28, 2017 18:07 IST

ज्येष्ठ वकील आणि ख्यातनाम कायदेतज्ञ तेहमतान आर. अंध्यारूजीना यांचं निधन

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील, विख्यात विधिज्ञ आणि घटनातज्ज्ञ थेम्प्टन रुस्तमजी (टी.आर.) अंध्यारुजिना यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. दुपारी डुंगरवाडी पारशी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा कुटुंबियाखेरीज कायदा आणि न्यायालयीन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पहिल्या सरकारच्या काळात सन १९९६ ते १९९८ पर्यंत अंध्यारुजिना भारताचे सॉलिसिटर जनरल होते. त्याआधी सन १९९३ ते १९९५ या काळात ते महाराष्ट्राचे अ‍ॅडव्होकेट जनरल होते.अंध्यारुजिना यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून सर चार्लस सार्जंट शिष्यवृत्ती व विष्णू धुरंधर सुवर्णपदकासह कायद्याची पदवी प्राप्त केली. यानंतर लगेचच त्यांनी अ.भा. सेवा परीक्षा दिली व त्यात तिसरे आल्याने त्यांची भारतीय विदेश सेवेसाठी निवड झाली. परंतु त्यांनी वकिलीच करण्याचे ठरविले. सुरुवातीची १६ वर्षे ख्यातनाम वकील एच. एम. सिरवई यांच्यासोबत काम केल्यानंतर अंध्यारुजिना यांनी स्वतंत्रपणे वकिली सुरु केली. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी त्यांना ज्येष्ठ वकील म्हणून अधिनामित करण्यात आले. सुमारे ६० वर्षांच्या वकिली कारकिर्दीत त्यांनी खास करून सर्वोच्च न्यायालयात किचकट घटनात्म मुद्दे असलेली असंख्य प्रकरणे हाताळली. त्यात संसदही राज्यघटनेचा मूळ ढाचा बदलू शकत नाही, असा निकाल दिला गेलेले केशवानंद भारती प्रकरण, कर्नाटक राज्य सरकार बरखास्तीचे एस.आर. बोम्मई प्रकरण, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या स्त्रियांच्या लैंगिक शोषणासंबंधीचे विशाखा प्रकरण, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविरुद्धचे विश्वासदर्शक ठरावासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच दिल्याचे प्रकरण, संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्यावरून १४ खासदारांना बडतर्फ केले गेल्याचे प्रकरण, अरुणा शानभाग हिचे इच्छामरण प्रकरण यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अंध्यारुजिना मृत्यूदंडाची शिक्षा कायद्यातून कायमची रद्द करण्याचे कट्टर पुरस्कर्ते होते व याकूब मेनन याच्या फाशीच्या अपिलाच्या वेळीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात त्या अनुषंगाने स्वतंत्र युक्तिवाद केला होता.मुंबई विद्यापीठ, भारतातील अनेक राष्ट्रीय विधी विद्यापीठे, पुण्याचे सिम्बॉयसिस लॉ कॉलेज आणि इंग्लंडमधील बेलफास्ट विद्यापीठातही त्यांनी कायद्याचे अध्यापन केले. त्यांनी अनेक महत्वाच्या सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम केले व त्यांच्याच समितीने केलेल्या शिफारशीनुसार आताचा ‘सरफासी’ कायदा केला गेला. अंध्यारुजिना यांनी अनेक पुस्तकांखेरीज कायदा आणि न्यायालये या विषयांवर वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून विपूल लेखन केले.