Join us  

कोरोनाच्या दहशतीत फुलताहेत कौटुंबिक नाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मागील दीड वर्षापासून आपण कोरोनाचा सामना करत आहोत. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मागील दीड वर्षापासून आपण कोरोनाचा सामना करत आहोत. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा झाली. असे असतानादेखील लॉकडाऊनची एक चांगली बाजू समोर येताना दिसत आहे. गेले दोन महिने नोकरवर्ग घरी थांबल्यामुळे रोजच 'कुटुंब दिन' साजरे झाल्याचे 'सकारात्मक' चित्र बहुतांश ठिकाणी पहायला मिळत आहे.

कोरोनाने विशेषतः लॉकडाऊनमुळे जुने दिवस परत आणले असे म्हणायला हरकत नाही. नोकरदार पालक वर्ग आणि मुले सध्या घरीच असल्याने त्यांच्यातील सु-संवाद वाढला आहे. त्यातच याला सोशल मीडियाची जोड मिळाल्यामुळे नात्यांची वीण अधिकच घट्ट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आधीची जीवनशैली आजच्या इतकी व्यस्त नव्हती. कोरोनामुळे असा निवांत वेळ पुन्हा एकदा सगळ्यांच्या वाट्याला आला आहे आणि कुटुंब गप्पांमध्ये, खेळांमध्ये रंगू लागली आहेत.

पाश्चात्य देशांमध्ये असलेल्या कौटुंबिक व्यवस्थेमुळे जागतिक कुटुंब दिवसाचा ठराव आणावा लागला, असा एक मतप्रवाह आहे. कुटुंबाचे महत्त्व, कुटुंब व्यवस्था, आपली माणसे याचे अनेक आदर्श आपल्या देशात पाहायला मिळतील. मात्र, सध्याची व्यस्त जीवनशैली लक्षात घेता प्रत्यक्षातल्या भेटीपेक्षा समाजमाध्यमांतली भेट पुष्कळच सोयीची झाली आहे.

सोशल मीडियावर रंगली कौटुंबिक मैफल

- लॉकाडाऊन सुरू झाल्यापासून कुटुंब संवाद, नात्यात आलेला दुरावा कमी करणे, एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे, नातेसंबंध दृढ करणे अशा कितीतरी गोष्टी काळात सुरू झाल्या.

-व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, हाइक इत्यादी माध्यमांवर किती तरी फॅमिली ग्रुप्स तयार झाल्याचे पाहायला मिळतात. कुटुंबातील जमतील तेवढे सगळे सदस्य या ग्रुपमध्ये असतात. यामुळे नात्यांची एक वेगळी वीण तयार झालेली पाहायला मिळत आहे.

- घरच्याच फॅमिली ग्रुपवर सुप्रभातपासून ते क्लासहून यायला उशीर होईल, विशेष रेसिपीज काय केल्या अशा दिवसभरातल्या घडामोडींचे शेअरिंग करण्यापर्यंत काहीही पोस्ट केले जाते.

ऐंशीच्या दशकातील मालिकांची भुरळ

- ३० ते ३५ वर्षांपूर्वी दूरदर्शनवर दाखवल्या जाणाऱ्या रामायण, महाभारतसारख्या पौराणिक, तर देख भाई देख, जंगल बुकसारख्या विनोदी व अन्य मालिका पुन्हा दूरदर्शनवर दाखवल्या जात आहेत.

- आजच्या पिढीला नवीन असणाऱ्या या मालिकांमधील संवादांनी भुरळ घातली आहे. त्यामधील संवाद घराघरांत बोलले जात आहेत. मालिकांमधील संवादांमुळे का होईना घरातील वातावरण हलके-फुलके ठेवण्यास मदत होत आहे.

- लॉकडाऊनमुळे मराठी, हिंदी मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने प्रेक्षक पुन्हा एकदा दूरदर्शन व त्यावर दाखविल्या जाणाऱ्या विविध मालिकांच्या प्रेमात पडले आहेत.

कोट :

कोरोनामुळे अतोनात नुकसान झाले आहे. दुसऱ्या बाजूचा विचार केला असता कुटुंब व्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे कुटुंबातील सदस्य एकत्र आल्याने त्यांच्यामधील सुसंवाद वाढला. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा दूर होऊन खऱ्या अर्थाने 'एकत्र कुटुंब- सुखी कुटुंब’ ही कुटुंबाची मूळ संकल्पना पुन्हा नव्या रूपात पाहायला मिळत आहे.

- वर्षा विद्या विलास, सामाजिक कार्यकर्त्या