Join us  

असुविधांचा जीवघेणा प्रवास! अरुंद पूल, तुटलेल्या पाय-या, चिंचोळ्या जागेमुळे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:54 AM

लोअर परळ स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात झालेल्या टॉवर्समुळे कॉर्पोरेट आॅफिसेसची संख्या येथे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

ठळक मुद्देलोअर परळ स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात झालेल्या टॉवर्समुळे कॉर्पोरेट आॅफिसेसची संख्या येथे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.गेल्या काही वर्षांत सकाळ-संध्याकाळ या स्थानकावरील प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे.

- पूजा दामले 

मुंबई : लोअर परळ स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात झालेल्या टॉवर्समुळे कॉर्पोरेट आॅफिसेसची संख्या येथे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सकाळ-संध्याकाळ या स्थानकावरील प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, फलाट क्रमांक २ आणि ३ वरील पायऱ्या नसलेला घसरता पूल, फलाट क्रमांक १च्या बाहेर असलेल्या पुलाची आणि लोअर परळ स्थानकातून बोहर पडणाऱ्या पुलाच्या तुटलेल्या पायऱ्या तसेच स्थानकाबाहेरील अरुंद पूल, चिंचोळी वाट यामुळे प्रवाशांना या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

लोअर परळ स्थानकावर एकूण तीन फलाट असून, यापैकी दोनच फलाटांवर गाड्या थांबतात. या स्थानकावरून लालबाग तसेच वरळी नाक्याला जाणे सोयीचे असल्यामुळे अनेक प्रवासी या स्थानकावर उतरतात. फलाट क्रमांक २, ३ वरील पुलाला पायऱ्या नाहीत. त्यामुळे या पुलावरून अनेक जण घसरून पडतात. दुसरीकडे फलाट क्रमांक १च्या बाहेरील पुलाच्या व लोअर परळ स्थानकातून बाहेर पडणारा पुलाच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. गर्दीच्या वेळी कोणी प्रवासी पडल्यास अन्य प्रवासीही त्याच्यावर कोसळून एल्फिन्स्टन दुर्घटनेसारखी जीवघेणी दुर्घटना घडण्याची भीती आहे.

 

येथील दादर बाजूच्या पुलावरील लोखंडी पत्रे गुळगुळीत झाले आहेत. फलाटाची उंचीही कमी आहे. त्यामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये चढायला-उतरायला त्रास होतो. वरळी नाक्यापर्यंत जोडणाऱ्या पादचारी पुलाचे कामही गेल्या दोन वर्षांपासून थांबलेले आहे.

- छोट्या सुधारणा करा!प्रशासन मोठ्या गोष्टींकडे लक्ष देते, पण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. त्यातूनच मोठे अपघात होण्याचा धोका संभवतो. फलाट क्रमांक २, ३ वरच्या पुलाला पायऱ्या नाहीत. घसरण असल्यामुळे इथे अपघात होऊ शकतात. पुलावरील लोखंड्याचे पत्रे गुळगुळीत झाले आहेत. गुळगुळीत पत्र्यांवरून एका जरी प्रवाशाचा पाय घसरला तर दहा प्रवासी पडून अपघात होऊ शकतो. एका पुलाच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. अशा छोट्या गोष्टींत सुधारणा केली पाहिजे. फेरीवाल्यांसाठी धोरण आखले पाहिजे. नियमावलीचे पालन विक्रेत्यांनी करायला पाहिजे.- किशोरी पेडणेकर, स्थानिक नगरसेवक

- पाठपुरावा सुरूलोअर परळ स्थानकावरील प्रवाशांचा ओघ गेल्या काही वर्षांत वाढला आहे. वाढती गर्दी पाहता दोन वर्षांपूर्वीच एमएमआरडीएकडे पादचारी पूल बांधण्याची मागणी केली आहे. गेली दोन वर्षे आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परंतु, अद्याप काहीही झालेले नाही. स्थानकाच्या फलाट क्रमांक १च्या चर्चगेटच्या दिशेला असणाऱ्या महिला डब्यापासून वरळी नाक्यापर्यंत पादचारी पूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. पूल तयार झाल्यास वरळी नाका आणि सेनापती बापट मार्गावर जाणाऱ्या  प्रवाशांना त्याचा फायदा होईल. स्थानकाबाहेर होणारी गर्दी कमी होईल. मध्यंतरी करी रोड, डिलाई रोडला जोडणारा पूल बांधण्यात येणार होता. पण, स्थानिकांनी नकार दिल्याने हे काम अर्धवट राहिले आहे.- सुनील शिंदे, स्थानिक आमदार 

- वेळीच लक्ष द्यावेलोअर परळ स्थानकावर सकाळ-संध्याकाळी प्रवाशांची गर्दी असते. या वेळी प्रवाशांचे अतोनात हाल होतात. एकाचवेळी गाड्या आल्यावर प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी असलेल्या चिंचोळ्या गल्लीमुळे गर्दी वाढत जाते. गर्दीच्या वेळा सोडल्यास या स्थानकावर कमी गर्दी असते. तरीही प्रवाशांचे हाल थांबवण्यासाठी प्रशासनाने वेळीच लक्ष दिले पाहिजे.- दीप्ती शहा, प्रवासी

- पायऱ्या हव्यातसकाळी साडे दहापर्यंत आणि दुपारी चार वाजल्यानंतर या स्थानकावर प्रचंड गर्दी असते. या स्थानकापासून खासगी कंपन्या जवळ असल्याने येथील गर्दीत भर पडते. गाडीत चढणे - उतरणे प्रवाशांना शक्य होत नाही. एका पुलाला पायऱ्या नसल्याने त्रास होतो. पुलाला पायऱ्या असणे गरजेचे आहे.- राजेश चव्हाण, प्रवासी

- गर्दीतून वाट काढणे कठीणलोअर परळ स्थानकाच्या पुलावर जितकी गर्दी होते, त्यापेक्षा अधिक गर्दी ही स्थानकाबाहेर होते. स्थानकातून पूर्वेला बाहेर पडल्यावर असणारा पूल अरुंद आहे, तर पश्चिमेकडे चिंचोळी गल्ली आहे. या गल्लीत विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून वाट काढणे कठीण होते.- रंजना तन्ना, प्रवासी

- ‘त्या’ दिवशीही तशीच गर्दीएल्फिन्स्टन स्थानकावर ज्या दिवशी दुर्घटना झाली, तेव्हा लोअर परळ स्थानकावरही तशीच गर्दी होती. मी नेहमीप्रमाणे त्या वेळेतच येथून जात होते. पावसामुळे या स्थानकाच्या दोन्ही पुलांवर प्रचंड कोंडी झाली होती. शेवटच्या पायरीपर्यंत प्रवासी उभे होते. सुदैवाने दुर्घटना झाली नाही.

- मैथिली वर्दम, प्रवासी

 

- सूचना, तक्रारी, व्हिडीओ : ‘लोकमत’च्या वाचकांच्या ‘मुंबईचा ऱ्हास आता बास’ या मालिकेसंदर्भात काही सूचना, प्रतिक्रिया असल्यास ८८४७७४१३०१ या क्रमांकावर कळवाव्या. लोकल स्थानकांच्या तक्रारीही या क्रमांकावर पाठवता येतील. स्थानकांतील समस्यांचे व्हिडीओदेखील वाचक या क्रमांकावर पाठवू शकतात.- कार्यकारी संपादक

टॅग्स :आता बासपश्चिम रेल्वेमुंबईभारतीय रेल्वे