Join us  

चेंबूरमध्ये रंग लावण्यास नकार दिल्याने जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 3:30 AM

रंग लावण्यास नकार दिला म्हणून चेंबूरमध्ये २ मित्रांवर जीवघेणा हल्ला चढविण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. यात महेश सिंग (२४), अक्षय पारिया (२०) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई : रंग लावण्यास नकार दिला म्हणून चेंबूरमध्ये २ मित्रांवर जीवघेणा हल्ला चढविण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. यात महेश सिंग (२४), अक्षय पारिया (२०) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चेंबूरमधील विजयनगर परिसरात महेश सिंग (२४) हा कुटुंबीयांसह राहतो. शुक्रवारी दुपारी १च्या सुमारास तो मित्र अक्षय पारिया (२०)सोबत बाजारात सामान आणण्यासाठी बाहेर पडला. कलेक्टर कॉलनी येथून जात असताना, तेथे काही तरुण धुळवड खेळत होते. त्यांचे लक्ष या दोघांवर गेले. दोघांनाही रंग लावण्यासाठी ते पुढे आले. ‘माझी आजी वारली असून, मला १ वर्ष सुतक आहे. त्यामुळे मला रंग लावू नका,’ अशी विनवणी महेशने केली. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या तरुणांनी जबरदस्तीने दोघांनाही रंग लावण्यास सुरुवात केली. महेश व अक्षयने त्यास विरोध करताच, त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. नशेत असलेल्या तरुणांनी लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यांनी महेश व अक्षयला मारहाण केली. जखमी अवस्थेतील दोघांना स्थानिकांनी शताब्दी रुग्णालयात दाखल केले. दोघांवरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची वर्दी लागताच, चेंबूर पोलीस तेथे दाखल झाले. महेशच्या जबाबावरून वरील घटनाक्रम समोर आला. या प्रकरणी समाधान, सचिन, प्रशांत, संकेत व त्याच्या अन्य मित्रांवर हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबई