फडणवीस हे महाराष्ट्राला मिळालेले ‘गॉड गिफ्ट’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 03:13 AM2019-07-25T03:13:12+5:302019-07-25T06:22:46+5:30

चंद्रशेखर बावनकुळे : इच्छा असेपर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील

Fadnavis is the 'God Gift' from Maharashtra | फडणवीस हे महाराष्ट्राला मिळालेले ‘गॉड गिफ्ट’

फडणवीस हे महाराष्ट्राला मिळालेले ‘गॉड गिफ्ट’

Next

कल्याण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला मिळालेले गॉड गिफ्ट आहे. त्यांची इच्छा असेपर्यंत, तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी येथे व्यक्त करून, मुख्यमंत्री पदावरून युतीमध्ये सुरू असलेल्या वादाला पुन्हा फोडणी दिली. महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभा ठाणे विभाग आणि कल्याण तेली समाज यांच्या विद्यमाने मंगेशी सभागृहामध्ये समाजाच्या कार्यक्रमात उर्जा मंत्री बावनकुळे यांना सन्मानित केले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बावनकुळे यांनी माझ्यासारखे एक हजार कार्यकर्ते तयार झाले, तरी फडणवीस यांच्या इतक्या ताकदीचे काम करता येऊ शकत नाही. राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार असून, फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

राजकारणात काम करताना समाजाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला; मात्र काही प्रश्न सोडविणे राहून गेले आहे. देशासाठी २०२० ते २०३५ हा सुवर्ण काळ आहे. त्याकरीता समाजाने शिक्षणावर भर दिला पाहिजे. तेली समाजीतील तरुण पिढी समाजकार्याकडे वळत नाही. तिला समाजकार्याकडे वळवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मोदी सत्तेवर येण्याआधी आर्थिक क्षेत्रात भारत १६ व्या क्रमांकावर होता. मोदी पुन्हा सत्तेवर आल्यावर देश सहाव्या क्रमांकावर आल्याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमाला मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ. भूषण कर्डिले, आमदार नरेंद्र पवार, कार्यकारी संचालक चंद्रशेखर ऐरमे, तेली समाज ठाणे अध्यक्ष सुनिल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

रेल्वेने प्रवास... पावसाचा जोर पाहता बावनकुळे कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार की नाहीत, याविषयी साशंकता होती. मात्र, व्यस्त कार्यक्रमातून बावनकुळे यांनी हजेरी लावली. गुरुवारी एका न्यायालयीन प्रकरणात हजेरी लावायची असल्याने त्यांनी कमी वेळात जास्त संवाद साधून मुंबईच्या परतीचा प्रवास कल्याण स्थानकातून रेल्वेने केला.

राज्यात मुबलक वीज
राज्यात वीज भरपूर आहे. लोडशेडिंगची समस्या नाही. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडतात. कोकण विभागाची आजच बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला आहे. यावेळ तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आदेश दिल्याचे बावनकुळे म्हणाले.

फक्त एसएमएस करा...
उपस्थिताना संबोधित करताना कुठलीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करा, असे सांगून स्वत:चा मोबाईल नंबर दिला. मात्र मला फोन करु नका. कामाचा बराच व्याप असतो. कॉलऐवजी मला एसएमएस करा. काय काम आहे ते सांगा. ते काम नक्कीच होईल, असा विश्वास त्यांनी दिला.

Web Title: Fadnavis is the 'God Gift' from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.