वरळी विधानसभेवर दिग्गजांचा डोळा; प्रतिष्ठेची लढत रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 01:00 AM2019-08-10T01:00:54+5:302019-08-10T06:24:45+5:30

आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा

Eye of the giants on the Worli assembly | वरळी विधानसभेवर दिग्गजांचा डोळा; प्रतिष्ठेची लढत रंगणार

वरळी विधानसभेवर दिग्गजांचा डोळा; प्रतिष्ठेची लढत रंगणार

Next

- स्रेहा मोरे 

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन अहिर यांनी घड्याळाची साथ सोडून शिवबंधन बांधल्याने वरळी विधानसभा मतदारसंघाचे चित्र एकदम बदलून गेले. शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील शिंदे यांच्या ऐवजी येथून थेट शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेच मैदानात उतरतील, अशी हवा निर्माण झाल्याने हा मतदारसंघ एकदम हायप्रोफाईल झाला आहे.

सुनील शिंदे यांनी २०१४च्या निवडणुकीत सचिन अहिर यांचा पराभव केला होता. आता अहिरच सेनेत आल्याने त्याची स्थ़ानिक शिवसैनिकांमध्ये काही प्रमाणात नाराजीही जाणवली. शिवसैनिकांनी सोशल मिडीयावरुन संतापाला वाट मोकळी करून दिली होती. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही खळबळ उडाली. अहिरांपाठोपाठ पक्षाचे मुंबईतील नगरसेवकही सेनेत जाऊ नयेत म्हणून पक्षाने मोर्चेबांधणीही केली आहे.

मराठी मतदारांची संख्या बहुमतात असलेल्या या मतदारसंघात सुनील शिंदे यांनी बऱ्यापैकी मांड ठोकलेली आहे. त्यामुळेच या सुरक्षित मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा घाट असल्याची चर्चा आहे. त्यांचा मार्ग एकदम बिनधोक व्हावा यासाठीच सचिन अहिर यांना पक्षात आणण्यात आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बहुसंख्य मराठी लोकवस्तीमुळे वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्ये सात हजारांची वाढ झाली. तर शिवसेनेची मतं आठ हजाराने वाढली. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीने ११ हजार ५८४ मतं येथून मिळवली. याचा मोठा फटका काँग्रेसला बसला.

वरळी विधानसभेतील बहुसंख्य मतदारांची शिवसेनेवर निष्ठा असल्याने येथील एक गठ्ठा मते युतीच्या उमेदवाराला मिळतात. २०१४ मध्ये मनसेचा प्रभाव असतानाही त्यांना केवळ १८ हजार मतांपर्यंत मजल मारता आली. तर शिवसेनेने या ठिकाणी ३५ हजारची आघाडी घेतली होती. या वेळेस कोस्टल रोड प्रकल्पामुळे मच्छिमारांची नाराजी, स्थानिक राहिवाशांच्या रोषाचा सामना महापालिकेतील सत्ताधारी पक्ष म्हणजे शिवसेनेला करावा लागण्याची शक्यता आहे. तर बीडीडी चाळीच्या विषयाची रखडपट्टी हाही शिवसेनेसाठी चिंतेचा विषय आहे.
दोन दशके शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या वरळी विधानसभेत २००९ मध्ये राष्ट्रवादीने झटका दिला होता. मात्र २०१४च्या मोदी लाटेतही शिवसेनेने पुन्हा येथे भगवा फडकविला. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी तिसरा पर्याय म्हणून पुढे येऊ शकते.

आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप युती करून लढवणार आहेत, त्यामुळे त्या दृष्टीकोनातून वरळीच्या जागेवर नेमका कोण हक्क दाखविणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. अहिर यांच्या प्रवेशानंतर वरळी मतदार संघातून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, विद्यमान आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर ही नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. अहिर यांचे नाव भायखळ्यातूनही चर्चेत आहे.
 

Web Title: Eye of the giants on the Worli assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.