Join us  

कुर्ला रेल्वे स्थानकावर वाढला कमालीचा ताण, पुलांवरील गर्दी व्यवस्थापनाची समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 3:14 AM

कुर्ला रेल्वे स्थानकावर हार्बर आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांसह वांद्रे-कुर्ला संकुलातील कॉर्पोरेट कर्मचारी वर्गाचा ताण वाढतच असून, वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन हा मुद्दा आता कळीचा बनला आहे.

मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकावर हार्बर आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांसह वांद्रे-कुर्ला संकुलातील कॉर्पोरेट कर्मचारी वर्गाचा ताण वाढतच असून, वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन हा मुद्दा आता कळीचा बनला आहे. महत्त्वाचे म्हणजे कुर्ला रेल्वे स्थानकावर तब्बल सहा पूल असूनही या पुलांचा प्रवाशांकडून पुरेसा वापर होत नसल्याने ठरावीक तीन पुलांवरची गर्दी वाढत आहे. तीन पुलांवरील गर्दीला उर्वरित तीन पुलांवर वळविणे हे रेल्वे प्रशासनासमोरचे आव्हान असून, हे आव्हान प्रशासन कसे पेलते? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेत २३ निष्पाप जिवांचा बळी गेल्यानंतर मुंबईकरांकडून रेल्वे प्रशासनावर कठोर टीका होत आहे. पुलांच्या दुरुस्तीसह नव्या पुलांच्या मागणीचे आवाज उठविले जात आहेत. या आवाजांत ‘गर्दीचे व्यवस्थापन’ हा अत्यंत कळीचा मुद्दा असून, येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नगरसेविका डॉ. सईदा खान, कालिना विधानसभेतील भाजपाचे माजी सचिव राकेश पाटील यांनी जोर दिला आहे. आता रेल्वे प्रशासनाने येथील पुलांची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासह गर्दीचे व्यवस्थापन करावे, असे म्हणणे लोकप्रतिनिधींनी मांडले आहे.कुर्ला रेल्वे स्थानकावर हार्बर आणि मध्य रेल्वे एकत्र येत असल्या तरी येथील गर्दीला फाटे फोडण्यासह प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून प्रशासनाने येथील पुलांचा पुरेपूर उपयोग करावा, अशी मागणी स्थानिकांनीच लावून धरली आहे. मुळात बीकेसीमधील कॉर्पोरेट कर्मचारी वर्गाचा मोठा ताण कुर्ला रेल्वे स्थानकावर पडत असून, कालिना आणि सांताक्रुझ येथील कार्यालयीन कर्मचारी वर्गाचाही मोठा ताण स्थानकावर पडत आहे. पुलावरील गर्दीचे व्यवस्थापन करतानाच स्थानकाबाहेरील परिसरातील वाहतुकीचे नियोजन करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.गर्दीचे व्यवस्थापन : वाहतुकीचे नियोजन आवश्यक-कुर्ला पश्चिमेकडे गणपती मंदिरालगतचे अनधिकृत पार्किंग पहिल्यांदा बंद करण्यात यावे. अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या रिक्षांना शिस्त लावावी. फेरीवाल्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना उर्वरित ठिकाणी जागा द्यावी. फेरीवाल्यांचा प्रवाशांना त्रास होणार नाही; याची काळजी घ्यावी. बेस्ट बसच्या वळणाचे ठिकाण आणि त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षा यांचा ताळमेळ बसत नसल्याने पहिल्यांदा तो बसवावा. यासाठी वाहतूक विभागाने पुढाकार घ्यावा.महत्त्वाचे म्हणजे कुर्ला पश्चिमेला असलेली समस्याच कुर्ला पूर्वेला आहे. परिणामी, सर्वच यंत्रणांनी एकत्र येत येथील गर्दीचे आणि वाहतुकीचे नियोजन करावे, असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.एकंदर वांद्रे-कुर्ला संकुलासह सांताक्रुझ आणि अंधेरी येथून कुर्ला रेल्वे स्थानकाकडे दाखल होत असलेल्या गर्दीचे व्यवस्थापन आणि कुर्ला रेल्वे स्थानकावरील पुलांची कनेक्टिव्हिटी वाढविण्यात यावी. ज्या पुलांवर केवळ दोन आरपीएफ जवान तैनात असतात त्यांची संख्या वाढवत प्रत्येक फलाटावरील गर्दीच्या ठिकाणी आरपीएफ जवान तैनात करण्यात यावेत.या जवानांनी ठरावीक पुलांकडे वळणारी गर्दी उर्वरित पुलांकडे वळती करावी. म्हणजेच गर्दीचे व्यवस्थापन करावे. असे केल्यास मधल्या तीन पुलांवरील गर्दीचा भार हलका होईल; आणि साहजिकच गर्दीचे व्यवस्थापन होईल, असे म्हणणे कुर्ला येथील स्थानिकांसह लोकप्रतिनिधींनी मांडले.

टॅग्स :आता बासमुंबई लोकलमुंबई