Join us  

गनिमी काव्याने हातात मशाली घेऊन कोळी महिलांचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 1:00 PM

कोळी महिलांनी मशाली पेटवून बाजार संरक्षित करण्यासाठी एकजुटीने लढण्याची शपथ त्यांनी घेतली. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा जोरदार घोषणा त्यांनी यावेळी दिल्या.

मनोहर कुंभेजकरमुंबई- अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करणे हे तर खरे पालिका प्रशासनाचे काम आहे. मात्र अंधेरी (पूर्व), मरोळ जे.बी.नगर मेट्रो स्टेशनजवळ पुरातन सुक्या मासळीच्या बाजारामध्ये नव्याने होत असलेले अनधिकृत बांधकाम आक्रमक झालेल्या येथील मासळी बाजारात सुक्या मासळीची विक्री करणाऱ्या सुमारे 200 कोळी महिलांनी कोणाला सुगावा न लागू देता हातात हातोडा व मशाली घेऊन तोडून टाकले. मरोळ बाजार मासे विक्रेता कोळी महिला संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री भानजी यांच्या सह 200 कोळी महिलांनी हे आंदोलन केले. यावेळी 20 ते 25 कोळी बांधव देखील उपस्थित होते.यावेळी कोळी महिलांनी मशाली पेटवून बाजार संरक्षित करण्यासाठी एकजुटीने लढण्याची शपथ त्यांनी घेतली. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा जोरदार घोषणा त्यांनी यावेळी दिल्या.

येथील अतिक्रमण थांबविण्यासाठी काल रात्री 7 ते 8 यावेळेत कोळी महिलांनी मशाली हाती घेऊन मोठे आंदोलन केले, या आंदोलकांनी बाजारात  सुरू केलेले अतिक्रमण तोडून टाकले आणि बाजार संरक्षित करण्यासाठी मशाल तेवत ठेवण्याची प्रतिज्ञा करित या बाजाराचा सातबारा आंम्हा कोळी भगिनींच्या नावे करावा अशी जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी वेसावा, अर्नाळा उत्तन मालवणी मनोरी, भाटी, मढ, भाटी, रायगड अशा निरनिराळ्या ठिकाणांहून 200 कोळी महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

आजही आठवडे बाजाराची परंपरा मरोळ येथे सुरू असून अशिया खंडातील सर्वात मोठा असलेला  सुक्या मासळीचा बाजार दर शनिवारी भरतो. येथील सर्वात पुरातन आणि मोठा असलेला मरोळ येथील सुक्या मासळीचा बाजाराची जमीन मासे विकणाऱ्या कोळी भगिनींच्या नावे करावी, अशी मागणी बहुजन वंचित आघाडीचे नेते राजाराम पाटील यांनी यावेळी केली. येथील मासळी बाजाराच्या जागेवर मुंबई महानगरपालिका निरनिराळ्या कारणास्तव अतिक्रमण करू पाहात आहे, त्यांना विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत पाटील बोलत होते.

मुंबई महानगरपालिकेचे कार्य हे प्राथमिक सुविधा आणि दिवाबत्ती करण्याचे असून मालकी दाखविण्याचा कोणताही अधिकार त्यांना नाही. पिढ्यानपिढ्या ही जागा कोळी भगिनींनी सुरक्षित ठेवली असून सुकी मासळी विकण्यास परंपरेने वापर करीत असल्याने ही जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी येथील कोळी महिलांच्या नावे करावी अशी मागणी त्यांनी केली.

 शासनाने बाजारांच्या जमिनीचा वहिवाट अधिकार मान्य करून तात्काळ संपूर्ण मुंबईतील मासळी बाजाराच्या जमिनी कोळी भगिनींच्या नावे कराव्यात अशी जोरदार मागणी त्यांनी केली,  यावेळी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके  प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.या बाजाराच्या जमिनीवर महानगरपालिकेने  शिफ्टिंग च्या नावाखाली हॉटेल आणि बार रेस्टॉरंट, खानावळ या महानगरपालिकेच्या मेहेरबानीने येथे वसले आहेत ती बाजारावरील अतिक्रमणे हटविण्यात यावी अशी मागणी देखिल राजहंस टपके यांनी केली. यावेळी मरोळ बाजार मासे विक्रेता कोळी महिला संस्थेच्या अध्यक्षा राजश्री भानुजी यांनी आपल्या भाषणात महानगराच्या प्राईम लोकेशनवर असणारा हा बाजार सांभाळण्याची मोठी चळवळ आणि जागृती आपल्यामध्ये ठेवावी लागेल असे ठामपणे सांगितले.आपण कोणत्याही भूल थापांना बळी न पडता कोळी महिलांची ताकद अशीच कायम ठेवून एकजुट करूया असे आव्हान करून वेळ पडल्यास बाजार वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे संकेत त्यांनी दिले, 

 यावेळी कोळी महिला समाज सेविका रेखा पागधरे , मालवणी मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष हेमंत कोळी,  हरेश्वर कोळी,  किरण गायकवाड, अमृता कोळी यांनी भाषणे झाली.