Join us  

सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, मुख्तार अब्बास नक्वी यांचं आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:43 AM

प्रदेश भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने पहिल्यांदाच राज्यभरातील निवडक मुस्लीम महिलांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर शनिवारपासून येथे सुरू झाले. केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हाळगी प्रबोधिनीत शिबिराचे उद्घाटन केले.

मुंबई : प्रदेश भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने पहिल्यांदाच राज्यभरातील निवडक मुस्लीम महिलांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर शनिवारपासून येथे सुरू झाले. केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हाळगी प्रबोधिनीत शिबिराचे उद्घाटन केले.मोदी सरकारने अल्पसंख्याक समाजासाठी अर्थसंकल्पात सुमारे पाच हजार कोटींची तरतूद केली असून सरकारच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ होण्यासाठी त्याची माहिती देण्याचे काम मुस्लीम महिला कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.ते म्हणाले की, मुस्लीम समाज मागासलेला राहावा व सतत भयग्रस्त राहावा जेणेकरून त्यांची मते मिळवता येतील, असे काही राजकीय शक्तींना वाटते. पण त्यांना जरी असे वाटत असले तरी प्रत्यक्षात मोदी सरकारने मुस्लिमांच्या तुष्टीकरणाऐवजी सक्षमीकरणावर भर दिला आहे.तीन वर्षांत अल्पसंख्याक समाजातील दोन कोटी ४५ लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. यंदा दीड कोटीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. अल्पसंख्याक विद्यार्थी आयएएस व्हावेत यासाठीच्या प्रयत्नांना यश आले आहे. शिक्षणव रोजगारावर सरकारचा जास्तीत जास्त भर आहे.तिहेरी तलाकचा संबंध धर्माशी नसून ती एक कुप्रथा आहे. त्यामुळेच ती बंद होणे अतिशय गरजेचे आहे. ती काळाची गरज आहे. त्यामुळेच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच तिहेरी तलाकवर बंदी घालण्याचे विधेयक प्राधान्याने मंजूर केले जाईल, असे ते म्हणाले. तिहेरी तलाकवर जगातील बहुतांश मुस्लीम देशांमध्ये बंदी आहे. भारतातही तिहेरी तलाकवर बंदी घालणे आवश्यक आहे, असे मत नक्वी यांनी यावेळी व्यक्त केले. अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दिकी, मीरा-भार्इंदरच्या महापौर डिंपल मेहता, अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीस सिकंदर शेख व ऐजाज देशमुख, मोर्चाच्या महिला प्रमुख रिदा रशिद, भाजपा मुंबई उपाध्यक्ष हैदर आझम व डॉ. नाहिदा शेख उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई