Join us  

प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांमागे एकाचे शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 4:57 AM

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार ५० टक्के म्हणजेच प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांमागे एकाचे शोषण झालेले आढळून आले आहे.

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार ५० टक्के म्हणजेच प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांमागे एकाचे शोषण झालेले आढळून आले आहे. त्यामुळे बालकांच्या पालकत्वाची भूमिका समाजातील सर्व घटकांनी घ्यायला हवी, असे आवाहन बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी केले. मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, राज्यातील अनेक शाळांचे मुख्याध्यपक उपस्थित होते.सर्व बालकांचे संरक्षण व्हावे यासाठी रक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान राज्यातील सर्व शाळांत राबविण्यात येणार असून यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्यात येईल. भावी पिढी ही शारीरिक, भावनिक, मानसिकदृष्ट्या सुदृढ व्हावी यासाठी आयोगाने हे पाऊल उचलल्याचे घुगे यांनी सांगितले.बालहक्काची जपणूक होते का, हे शाळांनी पाहणे आवश्यक आहे. शाळांची गुणवत्ता तपासताना मुलांच्या हक्कासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी होते की नाही याचीही तपासणी करण्यात येऊ शकते. बालहक्क आयोगाच्या नियमांची शाळा दखल घेतात का, या धर्तीवर शाळांचे रँकिंग केले जाऊ शकते, अशी शक्यता शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.>दिवसातून तीनदा हजेरीराज्यातील सर्व शाळांमध्ये दिवसातून तीनदा हजेरी घेण्यात येईल. शाळा भरतेवेळी मुख्य हजेरी त्यानंतर दोनदा शाळेत आलेली मुले हजर आहेत की नाही यासाठी हजेरी होईल.>अशा असतील कार्यकक्षाराज्यातील ३६ जिल्ह्यांमधील सर्व शाळा, महाविद्यालये, गृहसंकुले, सार्वजनिक मंडळे, मेडिकल असोसिएशन्स, नागरी संघटना, नागरी वसाहतींमध्ये रक्षा अभियान राबविण्यात येईल. जिल्ह्यातील सरकारी, अनुदानित-विनाअनुदानित शाळा, स्वयंसेवी संस्था, शासकीय आणि निमशासकीय संस्थांच्या माध्यमातूनही ते राबविले जाईल.