Join us  

लिंकिंग रोडवरील दुभाजकावर होणार पावणेदोन कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 2:41 AM

वांद्रे लिंकिंग रोड येथे मध्यवर्ती दुभाजकाकरिता पावणेदोन  कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे.

मुंबई : वांद्रे लिंकिंग रोड येथे मध्यवर्ती दुभाजकाकरिता पावणेदोन  कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे. दुभाजकासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणे म्हणजे पैशांचा अपव्यय असल्याची तीव्र नाराजी नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे. मात्र सत्ताधारी शिवसेनेने याबाबतचा प्रस्ताव बहुमताने मंजूर केल्यामुळे तब्बल एक कोटी ८३ लाख रुपये दुभाजकांसाठी खर्च होणार आहेत. पश्चिम उपनगरात खरेदीचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या लिंकिंग रोड येथील दुभाजक बदलण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला होता. या प्रस्तावानुसार या रस्त्यावरील जुने दुभाजक काढून त्या ठिकाणी नवीन दुभाजक बसविण्यात येणार आहेत. या दुभाजकांमुळे पादचाऱ्यांना धोकादायक ठिकाणी रस्ता ओलांडणे शक्य होणार नाही, असा पालिकेचा दावा आहे. कॉम्प्युटर्स इंजिनीअर्स यांना हे काम देण्यात आले आहे. पण हे काम देण्यावरून नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.>काम यापूर्वीच सुरूदुभाजकावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यावर विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आक्षेप घेतला. तसेच रस्ते दुरुस्तीचे काम सुरू असतानाच दुभाजक लावण्यात यावेत, जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही, अशी सूचना नगरसेवकांनी केली. हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये प्रशासनाने आता मंजुरीसाठी आणला, परंतु या दुभाजकाचे काम यापूर्वीच सुरू झाले असल्याचे काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी निदर्शनास आणले. मात्र सत्ताधारी पक्षाने हा प्रस्ताव मंजूर केला.