Join us  

'दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करा'

By मनोहर कुंभेजकर | Published: December 10, 2023 6:45 PM

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांनी व्यायामाबाबत आवाहन केलं आहे.

मुंबई : कांदिवली पश्चिम पोईसर जिमखाना आयोजित 'उत्तर मुंबई क्रिडा महोत्सव' मध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांनी भेट दिली. फिट राहण्यासाठी रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करा असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.या वर्षी आतापर्यंत ७ हजार पेक्षा जास्त  स्पर्धक सहभागी झाले होते. एखाद्या राष्ट्रीय स्पर्धेत जसे खेळाडू सहभागी होतात अगदी तसा उस्फूर्त प्रतिसाद उत्तर मुंबई क्रीडा स्पर्धेला लाभला असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

उद्यापासून दिल्लीमध्ये खेलो इंडिया पॅरा गेम्स सुरु होत आहेत. त्यामुळे सर्व खेळाडूंनी खेलो इंडिया, फिट इंडियाच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी,  ज्यामुळे खेळाडूंसाठी असणाऱ्या सोयी, शासकीय मदत मिळू शकेल असे आवाहन पांडुरंग चाटे यांनी केले.

यावेळी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी,कांदिवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पो.निरीक्षक बाबासाहेब पाटील, वर्ल्ड रँकिंग पॅरालम्पिक आर्चरी खेळाडू आदिल मोह. नाझीर अन्सारी, पोईसर जिमखान्याचे उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, संजय शाह आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व बॅन्ड आणि मार्च पास पथकांनी मान्यवरांना सलामी दिली.यावेळी सर्व क्रिडाप्रकारातील स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आली.

खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देश आपले घर आहे असे समजून देशाचा विकास  घडवत आहेत. मी सुद्धा हेच सूत्र अंगिकारतो. पोईसर जिमखाना उभारण्यात अनेक व्यक्तींचा सहभाग होता त्यांनी रक्ताचे पाणी केले तेव्हा आज हा जिमखाना दिमाखात श्वास घेत आहे. सगळ्या खेळाडूंनी जिमखान्यातील सोयीसुविधांचा लाभ घ्यावा, अत्यंत नाममात्र दरामध्ये येथे खेळांचे शात्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते असे आवाहन त्यांनी केले.

नेहा साप्ते (रायफल शूटर)  मल्लखांबपटू निधी राणे,  प्रमित प्रभू (कराटे), सेजल गावडे (आर्चरी), शौर्य प्रभू (आर्चरी) ,क्रिश शाह (स्केटिंग), अथर्व अग्रवाल (स्केटिंग), विहांग मेस्त्री (स्केटिंग), रेयांश ठाकूर (आर्चरी), निखिल दुबे (बॉक्सिंग) यांचा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आदिल मोह. नाझीर अन्सारी म्हणाले," माझ्या शरीराला ९० % अर्धांगवायू झाला आहे. अशा स्थितीत मी आर्चरी सारख्या खेळामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतो. त्यामुळे तुम्ही तर सर्वार्थाने सक्षम आहात तुमच्यासाठी आकाश ठेंगणे आहे.

११८ गुण मिळवत कांदिवलीच्या ठाकूर इंटर., कांदिवली (प) ने फ्लूट बँड स्पर्धेत विजेता ट्रॉफी पटकावली. कनोसा हायस्कुल, माहीम उपविजेता राहिली. ब्रास आणि पाईप बँडसाठी सेंट. ऍन्टोनिया डिसिल्व्हा हायस्कुल, दादरला  चॅम्पियन ट्रॉफी प्रदान करण्यात आली. मार्च पास मध्ये स्वामी विवेकानंद स्कुल आणि ज्युनियर कॉलेज, कांदिवली (प) विजेता तर एस.व्ही.पी. पी, कांदिवली संघ उपविजेता ठरला.

टॅग्स :मुंबईगोपाळ शेट्टी