Join us  

प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 5:46 AM

राज्य सामाईक परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) राबविण्यात येत असलेल्या तीन वर्षीय विधि अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

मुंबई : राज्य सामाईक परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) राबविण्यात येत असलेल्या तीन वर्षीय विधि अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू आहे. अशातच ९ आॅक्टोबर रोजी मुंबई विद्यापीठाकडून पहिल्या सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच पहिल्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक कसे जाहीर केले जाऊ शकते, असा सवाल विद्यार्थी, पालकांकडून उपस्थित होत आहे. १४ नोव्हेंबरला विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची चौथी यादी जाहीर होणार असून, १६ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत आहे. मात्र, त्यापूर्वी मुंबई विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची नाराजी पालकांमध्ये आहे.मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या वेळापत्रकांमध्ये नेहमी काही ना काही गोंधळ असून त्याचा विद्यार्थ्यांना त्रास होतो. मुंबई विद्यापीठाने पदवीचे निकाल जाहीर करण्यास विलंब केला होता. त्यानंतर, गुणपत्रिकेमध्ये ग्रेड दिल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. ती लक्षात घेऊन सीईटी सेलकडून विधि अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू करण्यात आली. त्यानुसार, सीईटी सेलच्या तीन प्रवेश फेºया झाल्या. चौथ्या फेरीसाठीची आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची मुदत ८ नोव्हेंबरपर्यंत होती, तर १४ नोव्हेंबरला चौथी यादी जाहीर होणार आहे.चौथ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयीन स्तरावरील प्रवेश प्रक्रिया होईल. त्यामुळे विधि अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्यासाठी गोंधळ सुरू असताना, मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर दिले आहे. त्यानुसार, २१ ते २९ जानेवारी दरम्यान ही परीक्षा होईल.>परीक्षा पुढे ढकलण्यात यावीप्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाने परीक्षा जाहीर करायला हव्या होत्या. मात्र, विद्यापीठाने त्यापूर्वीच परीक्षा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विधि अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.- सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडण्ट लॉ कौन्सिल.