Every week's stomach gets two thousand plastic pieces | प्रत्येकाच्या पोटात आठवड्याला जातात दोन हजार प्लॅस्टिकचे तुकडे
प्रत्येकाच्या पोटात आठवड्याला जातात दोन हजार प्लॅस्टिकचे तुकडे

- स्नेहा मोरे

मुंबई  - प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे प्रदूषण वाढले, निसर्ग धोक्यात आला. त्यामुळे वेळीच प्लॅस्टिकचा वापर बंद करावा, अशी ओरड होत आहे. प्लॅस्टिक केवळ जलचर, झाडांचा जीव घेत नसून हळूहळू माणसांच्या जीवावरही उठल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांनी केलेल्या अभ्यास अहवालातून दर आठवड्याला प्रत्येकाच्या पोटात दोन हजार प्लॅस्टिकचे तुकडे जात असल्याचे समोर आले आहे. हे तुकडे एका क्रेडिट कार्डच्या वजनाएवढे असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

आॅस्ट्रेलियाच्या न्यूकास्टल विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास अहवालानुसार, प्लॅस्टिक खाण्याचे हे प्रमाण दर आठवड्याला पाच ग्रॅम, दर महिन्याला २१ ग्रॅम आणि दर वर्षाला २५० ग्रॅम (पाव किलो) एवढे आहे. सर्वाधिक प्लॅस्टिक पोटात जाण्याचा स्रोत हा पाण्याचे नळ आणि बाटल्या असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, वर्षाला प्रत्येक जण ५२ हजार प्लॅस्टिकचे तुकडे खातो.

युरोपियन आणि इंडोनेशियन पाण्याच्या तुलनेत भारत, अमेरिकेतील पाण्यात हे प्लॅस्टिकचे तुकडे सर्वाधिक असल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदविला आहे. अहवालानुसार, शेलफिश, बीयर, मीठ या पदार्थांमध्ये प्लॅस्टिकची मात्रा सर्वाधिक आढळली आहे. शिवाय सिंथेटिकचे कपडे, कार टायर्स, कॉन्टॅक्ट लेन्सेस असे मानवनिर्मित प्लॅस्टिक घटकही समुद्राच्या तळाशी आढळून ते वाढले आहेत. ही धोक्याची घंटा वेळीच ओळखून यंत्रणांनी प्लॅस्टिक उत्पादनाविषयी निर्णय घेण्याची वेळ आल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

आजारांचा धोका कायम
प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या पोटात प्लॅस्टिक जात असते. त्यातून मुख्यत: यकृत, मूत्रपिंड, पोट आणि श्वसनाशी निगडित आजारांचा धोका संभवतो. बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यात प्लॅस्टिक पोटात जाण्याने आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात पृथ्वी आणि मानवी शरीराची सुदृढता लक्षात घेऊन याविषयी यंत्रणांनी योग्य निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीवर भर दिला पाहिजे.
- डॉ. स्वामी साळुंके, श्वसनविकारतज्ज्ञ

...उशीर झाला आहे
प्लॅस्टिकवर नियंत्रण आणण्यासाठी आधीच खूप उशीर झाला आहे. पर्यावरणाप्रमाणे मानवी शरीर, स्वास्थ्यासाठीही प्लॅस्टिक हानिकारकच आहे. त्यामुळे आता तरी राज्यकर्त्यांना जाग येणार का, हा प्रश्न आहे. प्लॅस्टिकचा भस्मासूर रोखण्यासाठी उशीर झाल्यामुळे अजून एका पिढीला याचे दुष्परिणाम सहन करावे लागतील. त्यामुळे केवळ औद्योगिक कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकला परवानगी द्यायला हवी, अन्य दैनंदिन वापरातील प्लॅस्टिकचे उत्पादनच बंद करावे. त्यासाठी वापरकर्त्यांना दंड करावा, जेणेकरून वापर हळूहळू कमी झाला की उत्पादनावरही त्याचा परिणाम होईल. थेट उत्पादकांवर कारवाई केल्यास ते न्यायालयात धाव घेऊनही निर्णयावर स्थगिती आणण्याची शक्यता असते. त्यामुळे वापरकर्ते हेच लक्ष्य ठरवून प्लॅस्टिकवर बंदी घातली पाहिजे.
- डी. स्टॅलिन, पर्यावरणतज्ज्ञ


Web Title: Every week's stomach gets two thousand plastic pieces
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.