Join us  

अनुभव नसतानाही पालिका घेणार २५४ कोटींची यंत्रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 2:20 AM

कॉम्पॅक्ट पाइप सीवर क्लीनिंग : अरुंद रस्त्यांवरील मलवाहिनी सफाईसाठी करणार वापर

मुंबई : अरुंद रस्त्यांवरील मलवाहिन्यांच्या सफाईसाठी महापालिकेकडून कॉम्पॅक्ट पाइप सीवर क्लीनिंग मशीनची खरेदी करण्यात येत आहे. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठी २४ मशीन्सची खरेदी केली जाणार आहे. या एका मशीनची किंमत एक कोटी ९१ लाख एवढी आहे. तर एका मशीनच्या देखभालीवर वार्षिक एक कोटी आठ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे या २४ मशीन्सच्या खरेदीसह आठ वर्षांच्या देखभालीसाठी एकूण २५४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र या मशीनच्या वापराचा कोणताही अनुभव नसताना महापालिका करोडो रुपये यासाठी खर्च करणार आहे.

मुंबईतील ३०० मिमीपर्यंत व्यासाच्या आणि अरुंद रस्त्यांमधील मलवाहिन्यांच्या सफाईसाठी कॉम्पॅक्ट पाइप सीवर क्लीनिंग मशीनचा पुरवठा करून आठ वर्षांच्या कालावधीच्या देखभालीसाठी कंत्राट देण्यात येणार आहे. त्यानुसार शहर भागासाठी नऊ मशीन्स खरेदी करण्यात येत असून, एका मशीनसाठी एक कोटी ९१ लाख रुपये याप्रमाणे एकूण खरेदीसाठी १७ कोटी १९ लाख ४५ रुपये, तसेच आठ वर्षांच्या देखभालीसाठी ७७.९४ कोटी रुपये याप्रमाणे एकूण ९५.४७ कोटी रुपयांचे कंत्राट आर्यन पम्प्स अ‍ॅण्ड इन्व्हायरो सोल्सुशन या कंपनीला देण्यात आले आहे.पश्चिम उपनगरासाठीही नऊ मशीन्सचे ९५.४७ कोटी रुपयांचे कंत्राट याच कंपनीला देण्यात आले आहे. तर पूर्व उपनगरांसाठी एकूण सहा मशीन्सची खरेदी करण्यात येत आहे. यासाठी मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. मशीन खरेदीसाठी ११.४६ कोटी रुपये आणि आठ वर्षांच्या देखभालीसाठी ५१.९६ कोटी रुपये याप्रमाणे एकूण ६३.६५ कोटी रुपयांचे कंत्राट या कंपनीला दिले आहे.देखभालीसाठी आठ वर्षांचे कंत्राट!अशा प्रकारच्या मशीन्सचा वापर महापालिकेने यापूर्वी केलेला नाही. मात्र सुरुवातीला एका मशीनचा प्रयोग न करता पालिका अनुभव नसतानाही २४ मशीन्सची खरेदी करणार आहे. देखभालीचे कंत्राटही थेट आठ वर्षांसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे एका वर्षाच्या हमी कालावधीनंतर पुढील आठ वर्षांच्या देखभालीसाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे. यासाठी शंभर कोटींची निविदा असताना प्रशासनाने तीनशे कोटी खर्च करण्याची तयारी दाखवली आहे.

टॅग्स :मुंबई