Join us  

निवडणुकीची विशेष सुट्टी असूनही शिक्षकांना शाळांनी मागितले रजेचे अर्ज, शिक्षक परिषदेची शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 1:25 PM

२५ जून रोजीची विशेष सुट्टी असल्याने शिक्षकांच्या रजा कापण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे.

मुंबई : मुंबई पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षकांना मतदान करता यावे यासाठी शाळांना विशेष सुट्टी दिल्यावर सुद्धा शिक्षकांकडून रजेचा अर्ज मागितला जात असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून येत असून २५ जून रोजीची विशेष सुट्टी असल्याने शिक्षकांच्या रजा कापण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे.जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्राच्या संदर्भानुसार मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी मुंबईतील उत्तर, पश्चिम व दक्षिण विभागातील सर्व शाळांना मुंबई पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा व मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी २२ जून रोजी आदेश काढून शाळांना विशेष सुट्टी जाहीर केली. त्यामुळे शिक्षक मोठ्या संख्येने मतदान करू शकले.मुंबईतील अनेक शिक्षक मुंबईत राहत नसल्याने ते मुंबईत मतदान करू शकले नाही पण कोकण पदवीधर मतदार संघात त्यांनी ठाणे, नवी मुंबई व पालघर जिल्ह्यात मतदान केले. तरी देखील मुंबईत दुसऱ्या दिवशी शाळा प्रशासनाने सी एल (किरकोळ रजा) रजेचा अर्ज मागीतल्याच्या तक्रारी आल्या असून त्याची दखल घेत अनिल बोरनारे यांनी आज शिक्षण उपसंचालकांकडे शिक्षकांना शाळांनी अशा रजेच्या अर्जाची मागणी करू नये व त्याविषयी शाळांना पत्र देऊन संभ्रम दूर करण्याची मागणी केली आहे