Even after 10 days of the accident the residents are helpless | दुर्घटनेच्या दहा दिवसांनंतरही रहिवासी उघड्यावरच
दुर्घटनेच्या दहा दिवसांनंतरही रहिवासी उघड्यावरच

मुंबई : मालाड पूर्व येथे पालिकेच्या जलाशयाची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेला दहा दिवस उलटले. परंतु, या दुर्घटनेत बेघर झालेल्या नागरिकांची डोक्यावर छप्पर मिळवण्यासाठी वणवण सुरू आहे. मुलांच्या शाळा-नोकरीधंदा सोडून माहुल येथे स्थलांतरित होण्यास नागरिक तयार नाहीत. त्यामुळे कोणी रुग्णालयात तर कोणी नातेवाइकांकडे आश्रय घेतला आहे़ मदतीसाठी त्यांनी आता सरकारला साकडे घातले आहे.


मालाड पूर्व, पिंपरीपाडा येथे पालिकेच्या जलाशयाची भिंत १ जुलैच्या मध्यरात्री कोसळली. या दुर्घटनेत २९ लोकांचा मृत्यू झाला, १०२ जखमी आहेत. या दुर्घटनेत कोणाचे घर वाहून गेले तर कोणाचे सामान, एका रात्रीत त्यांचे संसार रस्त्यावर आले आहेत. राज्य सरकार आणि महापालिकेने या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपये जाहीर केले. यापैकी राज्य सरकारने चार लाखांचा धनादेश दिला आहे. महापालिकेकडून अद्यापही जाहीर झालेली मदत मिळालेली नाही, अशी तक्रार पीडित रहिवासी करीत आहेत.
ही जागा वन खात्याची असून २००२ मध्ये या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येकी सात हजार रुपये घेण्यात येत होते. त्यानंतर पुनर्वसनाबाबत सरकारी पातळीवर कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. पालिकेची भिंत कोसळून ही दुर्घटना झाल्यामुळे माहुल येथे तात्पुरती घरे देण्यास प्रशासन तयार आहे. वन खात्याच्या मंजुरीनंतरच याबाबत निर्णय होईल, तसेच जाहीर केलेली आर्थिक मदत देण्याची कार्यवाहीही लवकरच सुरू करण्यात येईल, असे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.

अहवाल आणखी १५ दिवसांनी
मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन भिंत कोसळली, असा दावा पालिका अधिकारी करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार या दुर्घटनेची चौकशी उपायुक्तांमार्फत सुरू आहे. आणखी १५ दिवसांमध्ये याबाबतचा अहवाल अपेक्षित असल्याचे जल अभियंता खात्यातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, विविध सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन केलेल्या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना गुरुवारी पाठविण्यात आला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सीताराम शेलार यांनी सांगितले.

जलाशयाची पाहणी...
या जलाशयाला तडे गेले असल्याचा आरोप सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी बुधवारी स्थायी समितीमध्ये केला होता. त्यानंतर गुरुवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी जलाशयाची पाहणी केली. दोन्ही जलाशयांच्या छतावर वाढलेली झाडे आणि पडलेल्या चिरा यांना तातडीने दुरुस्त करण्याचा आदेश महापौरांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला. मुख्य जलअभियंता अशोककुमार तवाडिया, अभियंते देशमुख, नगरसेवक तुळशीराम शिंदे, आत्माराम चाचे व पालिकेचे पाणी खात्यातील अधिकारी या वेळी उपस्थित होते.


Web Title: Even after 10 days of the accident the residents are helpless
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.