Join us  

ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्या प्रकरण : सानपच्या अपिलावरील सुनावणी २७ नोव्हेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:04 AM

आंध्र प्रदेशची सॉफ्टवेअर इंजिनीअर ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या चंद्रभान सानप याच्या अपिलावरील सुनावणी २७ नोव्हेंबरला आहे.

मुंबई : आंध्र प्रदेशची सॉफ्टवेअर इंजिनीअर ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या चंद्रभान सानप याच्या अपिलावरील सुनावणी २७ नोव्हेंबरला आहे.चंद्रभान सानप याने दाखल केलेल्या अपिलावरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी होती. सानपच्या वकिलांनी वेळ मागितल्याने न्यायालयाने अपिलावरील पुढील सुनावणी २७ नोव्हेंबरला ठेवली.गेल्या वर्षी ३० आॅक्टोबर रोजी विशेष न्यायालयाने सानप याला २३ वर्षीय ईस्थरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरुद्ध सानपने उच्च न्यायालयात अपील केले, तर राज्य सरकारने त्याच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला.नाताळची सुट्टी साजरी करून ईस्थर आंध्र प्रदेशहून ५ जानेवारी २०१४ रोजी पहाटे लो. टिळक टर्मिनसला उतरली. आजूबाजूला रिक्षा-टॅक्सी उपलब्ध नसल्याने ईस्थर काही वेळ स्टेशनवरच बसली. ती एकटी आहे, हे हेरून त्याने ईस्थरला अंधेरीला सोडण्याचे आश्वासन दिले. मात्र बलात्कार करून तिची हत्या केली. तिचा मृतदेह भांडुप येथील झुडपात लपवण्याचा प्रयत्न केला.ईस्थरविषयी काहीच न कळल्याने तिच्या काकांनी ती हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानंतर १६ जानेवारी रोजी तिचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. १६ मार्च रोजी पोलिसांना सानपला पकडण्यात यश आले.

टॅग्स :न्यायालय