वाडा : शेतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या इरले-घोंगडीच्या जागी रेनकोट तसेच प्लास्टिक टोप्यांनी अतिक्रमण केल्याने आदिवासींच्या इरले-घोंगडी बनविण्याच्या पारंपारीक व्यवसायावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पावसाळा सुरू झाला की बाजारात तातडीने रेनकोट उपलब्ध होत असल्याने तसेच इरले-घोंगडी तयार करण्याचे साहित्य मिळेनासे झाल्याने आदिवासी समाजातील कामगारांना इतर व्यवसायाचा शोध घ्यावा लागतो आहे.भातशेतीचे काम करीत असताना पावसापासून बचाव करण्यासाठी आणि शरीराला उब आणण्यासाठी इरले-घोंगडी वापरले जात असे. पावसाळा सुरू झाला की आदिवासी लोक पळसाची पाने, बांबू आणि अंबाडीचे वाख (सुत) काढून इरले-घोंगडी बनविण्याचे काम करताना दिसत. आदिवासींना या व्यवसायातून घरबसल्या दोन पैसे मिळत. परंतु शेतातील बैल, नांगर हद्दपार होऊन त्यांची जागा आधुनिक ट्रॅक्टरने घेतली. तशाच प्रकारे इरले-घोंगडीचा जमाना सुद्धा बदलत्या काळानुसार संपुष्टात आला. पावसाळा सुरू झाला म्हणजे शेतकरी इरले-घोंगडीची आगाऊ आॅर्डर आदिवासींना देत असत. पण आज या इरले-घोंगडीचा विसर शेतकऱ्यांना पडला आहे. उपयोग तर दुरच परंतु पुढच्या पिढीला त्याची माहिती सुद्धा नाही. उलट कृत्रिम, रेनकोट, गमबूट, टोप्या अशा साहित्याची खरेदी करताना शेतकऱ्यांचीच गर्दी दिसून येते. (वार्ताहर)
इरले-घोंगडी झाले हद्दपार
By admin | Updated: June 23, 2015 23:26 IST